विदेशी नागरिकाला सॅटेलाइट फोनसह अटक
By Admin | Updated: July 14, 2014 02:30 IST2014-07-14T02:30:01+5:302014-07-14T02:30:01+5:30
सॅटेलाइट फोन वापरण्यास बंदी असताना त्याचा वापर करणाऱ्या विदेशी नागरिकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून हा फोन हस्तगत केला

विदेशी नागरिकाला सॅटेलाइट फोनसह अटक
मुंबई : सॅटेलाइट फोन वापरण्यास बंदी असताना त्याचा वापर करणाऱ्या विदेशी नागरिकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी या आरोपीकडून हा फोन हस्तगत केला असून, याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईतही पोलिसांनी हायअॅलर्ट जारी केला आहे. त्यानुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शनिवारी अशाच प्रकारे मुंबई विमानतळावरील टर्मिनल ए १ या ठिकाणी प्रवाशांच्या सामानाची झडती सुरू होती. याच दरम्यान आॅस्ट्रेलिया येथून आलेल्या मॅक्डोनाल्ड अॅड्रूज (५४) या प्रवाशाच्या सामानाच्या झडतीत त्याच्या बॅगेत एक सॅटेलाइट फोन असल्याचे स्कॅनर मशिनमध्ये दिसून आले. स्कॅनर मशिनवरील कर्मचाऱ्याने तत्काळ ही माहिती येथील सुरक्षारक्षकांना दिली. त्यानुसार त्यांनी या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे सामान तपासले असता, त्यात त्यांना हा सॅटेलाइट फोन सापडला. या फोनची किंमत १ लाख असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आरोपीविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मलेशिया येथे नोकरी करणाऱ्या या इसमाची पत्नी मूळची गोवा येथे राहणारी असल्याने तिला भेटण्यास तो आला होता. मात्र त्याच्याकडील सॅटेलाइट फोनसाठी त्याने परवानगी घेतली नसल्याने त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. (प्रतिनिधी)