शाळेजवळ अपघाताची वाट पाहताय का? मालाड पश्चिमेकडील पालकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:10 IST2024-12-13T15:09:07+5:302024-12-13T15:10:16+5:30

मालाडमधील सुंदरनगर परिसरात शाळेजवळील रस्त्यावर डबल पार्किंग व बेकायदा स्टॉल्समुळे पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे.

Are you waiting for an accident near the school Question from parents in Malad West | शाळेजवळ अपघाताची वाट पाहताय का? मालाड पश्चिमेकडील पालकांचा सवाल

शाळेजवळ अपघाताची वाट पाहताय का? मालाड पश्चिमेकडील पालकांचा सवाल

गौरी टेंबकर-कलगुटकर 

मुंबई :

मालाडमधील सुंदरनगर परिसरात शाळेजवळील रस्त्यावर डबल पार्किंग व बेकायदा स्टॉल्समुळे पादचाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागते आहे. या परिस्थितीमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मुलांच्या अपघाताची वाट पहताय का? असा सवालही पालकांमध्ये विचारला जात आहे.

मालाड पश्चिमेकडे सुंदर नगर परिसरात इन्फंट जीजस, डॉ. एस. राधाकृष्ण इंटरनॅशनल स्कूल, दालमिया आदी शाळा आणि महाविद्यालय आहेत. या ठिकाणी नर्सरी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. यातील राधाकृष्ण शाळेच्या एका गेटपाशी मोठ्या प्रमाणात डबल पार्किंग करण्यात येते. त्यातच आजूबाजूच्या रस्त्यावर फेरीवाल्यांनी टपऱ्या, चायनीज कॉर्नर आदींसह दुकाने उभारली आहेत. त्यामुळे परिसरात जीवघेणी वाहतूक कोंडी निर्माण होते.

यात भरीस भर म्हणजे बांधकाम साहित्य घेऊन जाणारे मोठमोठे ट्रक तसेच सिमेंट मिक्सर देखील याच मार्गावरून नेले जातात. यामुळे येथील शाळांमध्ये येणारे विद्यार्थी आणि त्यांची ने-आण करणाऱ्या पालकांमध्ये सदैव भीतीचे वातावरण असते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने तसेच पालिकेकडून याठिकाणी लक्ष घालत बेकायदा स्टॉल, दुकाने आणि पार्किंगवर अंकुश बसवणे गरजेचे असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे.

खासगी वाहनाने जाणारे लहान विद्यार्थी  रांगेत रस्ता ओलांडतात. त्यावेळी एखाद्या भरधाव वाहनामुळे मोठा अपघात या परिसरात घडू शकतो. नोकरदार पालकांना मुलांना शाळेत पाठवण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, मात्र त्यांच्या मनात नेहमीच धास्ती राहते.
- एक पालक

वाहतूक कोंडीमुळे शाळेतून घरी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नाहीत. तसेच शाळा भरतानादेखील रिक्षा या परिसरात येण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना शाळेत सोडताना विनाकारण उशीर होतो. 
- एक पालक

Web Title: Are you waiting for an accident near the school Question from parents in Malad West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.