मुंबई : पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने कान, नाक आणि घशातील संक्रमणाचे प्रमाण वाढते. त्यातच सतत इअरफोन किंवा ब्ल्यूटूथ इअरबड्स वापरल्याने कानात ओलसरपणा राहतो. त्यामुळे ‘ऑटिटिस एक्सटर्ना’ किंवा ‘ऑटोमायकोसिस’ या बुरशीजन्य संसर्गाचा धोका वाढतो. या संसर्गामुळे कानात वेदना, खाज, पूस्त्राव, चिडचिड आणि ऐकण्यात अडथळा अशी लक्षणे दिसतात. उपचारांकडे दुर्लक्ष केल्यास कानाच्या आतील भागाला इजा पोहोचून श्रवणशक्ती कमी होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
वाढते संक्रमण
हवेत वाढलेली आर्द्रता बुरशी व जीवाणूंच्या वाढीस पोषक ठरते. परिणामी घशात खवखव, कानात वेदना, नाक वाहणे व सतत खोकला अशी लक्षणे दिसून येत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मध्यम ते गंभीर संसर्ग होण्याचा धोका आहे.
कानात ओलसरपणा
इअरफोन/ब्लूटूथ इअरबड्स सतत वापरल्याने कान झाकला जाऊन कानातील नैसर्गिक हवेचा प्रवाह अडतो. परिणामी, ओलसरपणा कायम राहून बुरशी, जीवाणूंना वाढीस पोषक वातावरण मिळते.
इअरफोन्स नेहमी स्वच्छ ठेवा
इअरफोन किंवा ब्लूटूथ इअरबड्स हे कानाच्या संसर्गाचे प्रमुख कारण ठरत असल्याने त्यांची स्वच्छता राखणे खूप महत्त्वाचे आहे.
इअरफोनवर धूळ, घाम व ओलसरपणा साचल्याने पृष्ठभागावर बुरशी व जंतूंची वाढ जलद होते. कानात लावल्यावर हे जंतू थेट आत प्रवेश करून संक्रमण घडवतात. त्यामुळे दर २ ते ३ तासांनी स्वच्छ कापडाने पुसून पूर्ण कोरडे झाल्याशिवाय वापरू नयेत.
दुसऱ्याचे इअरफोन्स वापरू नका
दुसऱ्याचे इअरफोन्स वापरू नका, कारण त्यावर कानातील मळ, घाम, बुरशी व जीवाणू राहू शकतात. संक्रमण पसरवण्याचे ते साधन बनतात. वारंवार संसर्ग झाल्यास श्रवणशक्तीवर परिणाम होतो.
काय काळजी घ्याल?
पावसाळ्यात कान कोरडे ठेवा.
सतत व दीर्घकाळ इअरफोन, इअरबड्स वापरणे टाळा.
इअरबड्स दर काही दिवसांनी स्वच्छ, कोरड्या कापडाने पुसा.
अल्कोहोल-बेस्ड वाइप्सने किंवा इअरटिप्स धुवून वाळवून स्वच्छता करा.
कानात त्रास जाणवल्यास स्वतः उपचार न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.