हे बस स्टॉप 'बेस्ट' आहेत का? प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षिण, पश्चिमेत चकाचक थांबे; पूर्व उपनगरात अस्वच्छ, तोडके-मोडके
By सचिन लुंगसे | Updated: November 10, 2025 12:38 IST2025-11-10T12:37:53+5:302025-11-10T12:38:16+5:30
Mumbai News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरातील बोरीवली व अंधेरीत चकाचक बस थांबे बांधणाऱ्या 'बेस्ट'ने पूर्व उपनगरातील स्टॉप आणि स्थानकांकडे कानाडोळा केला आहे. परिणामी प्रवाशांना अस्वच्छ, तोडके-मोडके थांबे, स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे.

हे बस स्टॉप 'बेस्ट' आहेत का? प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षिण, पश्चिमेत चकाचक थांबे; पूर्व उपनगरात अस्वच्छ, तोडके-मोडके
- सचिन लुंगसे
मुंबई - दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरातील बोरीवली व अंधेरीत चकाचक बस थांबे बांधणाऱ्या 'बेस्ट'ने पूर्व उपनगरातील स्टॉप आणि स्थानकांकडे कानाडोळा केला आहे. परिणामी प्रवाशांना अस्वच्छ, तोडके-मोडके थांबे, स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे.
दुसरीकडे हे थांबे आहेत की दुपारी आणि रात्री लोकांना आराम करण्याची जागा आहे, हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. झोपडपट्टी परिसरातील बहुतांशी थांब्यांवर गर्दुल्ल्यांनी ताबा असतो. त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. गोवंडी, मानखुर्द येथील थांब्यांच्या खांबांवरील पाटीवर बस क्रमांक आहेत.
मात्र, एकाही ठिकाणी बैठक व्यवस्था आणि शेड नाही. झोपडीलगतच्या शिवाजीनगर किंवा बैंगनवाडीतील थांब्यावर रात्री-अपरात्री गर्दुल्ले, भिकारी यांचा वावर असतो. येथील थांब्यावर शेड आणि बैठक व्यवस्था असावी, यासाठी गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक फय्याज आलम शेख यांनी वर्षभरापूर्वी 'बेस्ट'ला पत्र दिले होते. मात्र,
साधे त्याचे उत्तरही दिलेले नाही.
थांब्यावर बसच येईनात
शीतल सिनेमा बस थांब्याची बैठक व्यवस्था काढून 'बेस्ट'ने खांब लावल्याने प्रवाशांना उभे राहावे लागते. अंधेरी-कुर्ला जोड रस्त्यावरील काळे मार्गावरच्या कमानी थांब्यावर बस येत नाही. हा थांबा नेमका कोणासाठी, हा प्रश्न पडतो.
फिनिक्स मॉल ते चिराग नगरपर्यंतच्या थांब्यांना रिक्षा, अवजड वाहनांचा कायमच गराडा असतो. त्यामुळे हे थांबे नवख्या प्रवाशांना शोधावे लागतात. विद्याविहारच्या कोहिनूर मॉलच्या थांब्यावर प्रवासी कमी आणि आराम करणारेच जास्त दिसतात. घाटकोपर डेपोच्या रस्त्यावरील थांब्यावर रात्री महिला प्रवासी उभ्या राहू शकत नाहीत. कारण या परिसरात परेसे दिवे नाहीत.
डिजिटल बोर्ड धूळखात
कुर्ला, सायन, गोवंडी, चेंबूर, मानखुर्द आणि घाटकोपर येथील थांब्यांवर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास होतो. या परिसरातील थांब्यावर अनधिकृत जाहिरातींचा विळखा पडला आहे. या थांब्यावरील डिजिटल बोर्ड धुळीस मिळाले आहेत.
भिकाऱ्यांचे बस्तान
लाल बहादूर शास्त्री मार्गावरील कल्पना सिनेमा आणि कुर्ला डेपो येथील स्टॉप गर्दुल्ले, भिकाऱ्यांचे बस्तान असते. मिठी नदीलगतच्या थांब्यालगत फेरीवाले, तसेच संरक्षक भिंतीलगत मद्यपान सुरू असते.
बैठक व्यवस्थेचे तीनतेरा
कुर्ला पश्चिमेतील बसस्थानकात तर विचित्र अवस्था आहे. स्थानकालगत रिक्षांच्या रांगा लागत असून, सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना चालायला जागा नसते.
रिक्षा प्रवासी, बेस्ट प्रवासी आणि खासगी बसच्या प्रवाशांची रांग, यामुळे हा परिसर भरून जातो. येथील बसस्थानक अत्यंत जुनाट असून, बैठक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत.
३२५ क्रमांकाच्या बेस्टचा थांबा 3 फेरीवाल्यांसाठी आहे की प्रवाशांसाठी, हे कोडे उलगडत नाही. लांबलचक अशा या स्थानकांत गर्दीच्या वेळी कायमच रेटारेटी होते.
विद्याविहार बस स्थानकात डेब्रिज, सांडपाणी
विद्याविहार पश्चिमेकडील बसस्थानक चांगल्या अवस्थेत असले तरी स्थानकाच्या प्रवेशद्वारात अस्वच्छता असते.
प्रवेशद्वार डेब्रिज कायम पडलेले असते. लगतच्या शौचालयातून सांडपाणी रस्त्यावर वाहत असते.
स्थानकाचा परिसर विस्तीर्ण असला तरी प्रशासनाला त्याची निगा राखता आालेली नाही.