Join us  

संजय राऊत खरंच नाराज नाहीत ना? फेसबुक पोस्टचा रोख कुणाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 12:56 PM

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे

मुंबई - राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा बराच काळ रखडलेला शपथविधी अखेर संपन्न झाला. या शपथविधीनंतर सरकारस्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याचे वृत्त आले होते. आपण नाराज नसल्याची कबुली संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, संजय राऊत यांच्या फेसबुक पोस्टवरुन ते खरंच नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, शिवसेनेकडून जाहिर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुनिल राऊत यांना स्थान नसल्याचे समोर आल्यानंतर सुनील राऊत हे नाराज झाल्याचे वृत्त पसरले. तसेच या नाराजीमुळेच संजय राऊत हे शपथविधीला अनुपस्थित राहिले, अशी चर्चा रंगली होती. मात्र, नाराजीचे हे वृत्त संजय राऊत यांनी खोडून काढले. त्यानंतर, आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तर संदेश दिला नाही ना? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल. 

ज्यांनी तुम्हाला खंबीर साथ, वेळ आणि समर्पण दिलंय, अशा लोकांना नेहमी जपून ठेवा, अशी फेसबुक पोस्ट संजय राऊत यांनी लिहिली आहे. संजय राऊत यांच्य या फेसबुक पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या असून अनेकांनी त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, दुसरीकडे ट्विटरवरुनही नववर्षाच्या शुभेच्छा देताना त्यांचा रोख पक्षप्रमुखांकडे असल्याचं दिसून येतं. साल बदल रहा है, लेकीन साथ नही. स्नेह सदा बना रहे... असे राऊत यांनी म्हटलंय. 

राऊत यांच्या या दोन्ही पोस्टमुळे ते खरंच नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, आपल्या कुटुंबात कुणीही नाराज नाही, आम्ही काहीही मागणी केली नव्हती. आम्ही मागणारे नव्हे तर पक्षाला योगदान देणारे आहोत, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेमुंबई