Join us

सकाळी कौतुक, तर संध्याकाळी सरकारला घेरण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 04:11 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्यामुळे युती होणार अशी चर्चा सोमवारी दुपारपर्यंत रंगली

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्यामुळे युती होणार अशी चर्चा सोमवारी दुपारपर्यंत रंगली; मात्र सायंकाळी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावत ठाकरे यांनी दुष्काळावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली. सेनेच्या या दुहेरी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. सुमारे तासभर ही बैठक चालली. मंत्री दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे सर्वच मंत्री बैठकीला उपस्थित होते. दुष्काळग्रस्त भागात भेटी देऊन, शेतक-यापर्यंत सरकारी योजना पोहचत आहेत की नाही याची शहानिशा करावी. सरकारने जाहीर केलेली मदत लोकांपर्यंत पोहचते का याची पाहणी करावी, अशा सूचना ठाकरे यांनी मंत्र्यांना दिल्याचे सुत्रांनी सांगितले.दुष्काळी नाराजीच्या झळा शिवसेनेला लागणार नाहीत यासाठी आतापासूनच शिवसेनेने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यांपाठोपाठ पक्ष संघटनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत पोहचविण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता राज्यातील महत्वाच्या पदाधिकाºयांची सेनाभवनला तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांना पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदत घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे