लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य सरकारच्या अखत्यारितील विविध महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच केल्या जातील. त्यामुळे या पदांसाठी इच्छुक असलेल्यांच्या पदरी तूर्त निराशाच आली आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी वर्धा येथे पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात हे स्पष्ट केले की, या नियुक्त्या निवडणुकांनंतर होतील. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तुम्ही पक्षाला जिंकून दाखवा, निवडणुकीत दमदार यश मिळवा, त्यानंतर लगेच या नियुक्त्या केल्या जातील, असे ते म्हणाले. याचा अर्थ निवडणुकांमधील यशाची बक्षिसी म्हणून नियुक्त्या केल्या जातील हे आता स्पष्ट झाले आहे.
बावनकुळे यांनी हेही स्पष्ट केले की, निवडणुकांमध्ये ज्यांना तिकिटे मिळतील त्यांना महामंडळांवर नियुक्त केले जाणार नाही. महामंडळांचे महायुतीच्या ३ पक्षांमध्ये वाटपाचे सूत्र निश्चित करण्यास झालेल्या बैठकांमध्ये ६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले होते.
७८५ जणांना मिळणार संधी
बावनकुळे यांनी असेही म्हटले आहे की, महत्त्वाच्या अशा १४० महामंडळांवर अध्यक्ष, सदस्य म्हणून भाजपच्या ७८५ नेते, कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाईल, ती निवडणुकीनंतर करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे.
अनेकांच्या इच्छेवर पाणी
भाजपकडून बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, शिंदेसेनेकडून मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई तर अजित पवार गटाकडून खा. सुनील तटकरे आणि मंत्री हसन मुश्रीफ या बैठकांमध्ये सहभागी झाले होते. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन दिवसांपूर्वी एका पत्र परिषदेत असे म्हटले होते की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महामंडळांवरील नियुक्त्या केल्या जातील. मात्र, बावनकुळे यांच्या सोमवारच्या विधानाने अनेकांच्या इच्छेवर तूर्त तरी पाणी फिरले आहे.