विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
By मनोहर कुंभेजकर | Updated: September 8, 2025 13:19 IST2025-09-08T13:18:19+5:302025-09-08T13:19:11+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि ३ प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.

विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
- मनोहर कुंभेजकर, मुंबई
विभागप्रमुखांच्या नव्या नियुक्तीवरून शिंदेसेनेत वाद चिघळला असून, पश्चिम उपनगरात शिंदेसेनेचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पालिका निवडणुका जवळ आल्याने त्यांच्या नाराजीचा पक्षाला फटका बसू शकतो, अशी चर्चा सध्या नाराज समर्थकांमध्ये आहे.
शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई शहर आणि उपनगरातील ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि ३ प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत वर्णी लागली नसल्याने पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, गोरेगाव, दिंडोशी, चारकोप या ठिकाणी शिंदेसेनेत तीव्र नाराजी पसरली आहे.
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात उद्धवसेनेतून शिंदेसेनेत आलेले जितेंद्र जानावळे इच्छुक होते. मात्र, त्यांची वर्णी विलेपार्लेच्या प्रभारी विधानसभा प्रमुखपदी केल्याने ते नाराज झाले आहेत.
आपल्याला पक्षात घेताना विलेपार्लेचे विभागप्रमुख पद देणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले होते. मात्र, तसे झाले नाही. आपण शिवसेनेत ३० वर्षे कार्यरत होतो. आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, आपण पार्ल्यात शिंदेसेना जोमाने उभी केली असती. त्यामुळे पुनर्नियुक्त झालेल्या विद्यमान विभागप्रमुखांच्या हाताखाली आपण काम करणार नाही, असे ते म्हणाले.
गोरेगाव व दिंडोशी विधानसभेत प्रभारी विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केल्याने माजी विभागप्रमुख गणेश शिंदे हेही नाराज झाले आहेत. आपण येथे उद्धवसेनेला टक्कर देत सुरुवातीपासून गेली तीन वर्षे शिंदेसेना उभी केली. आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्याचे आश्वासन मिळाले होते. जर पक्षाने न्याय दिला नाही तर, आपल्यासह शेकडो कार्यकर्ते वेगळी वाट निवडणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
चारकोप विधानसभेत शिंदेसेनेने कोणाचीच वर्णी या यादीत लावली नाही. त्यामुळे येथे इच्छुक असलेले विधानसभा प्रमुख संजय सावंत नाराज झाले आहेत. आपण आणि आपले कार्यकर्ते उद्या पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदेसेनेच्या मुंबईतील विभागप्रमुखांची यादी जाहीर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिंदे सेनेनेही मुंबईतील प्रभारी विभागप्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांची यादी जाहीर करून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि तीन प्रभारी विधानसभा प्रमुखांची नियुक्ती शनिवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आली. पक्षाने एक्स हँडलवरून नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे.
प्रभारी विभाग प्रमुख
भांडुप - अशोक पाटील
मुलुंड - जगदीश शेट्टी
विक्रोळी - दत्ता दळवी
घाटकोपर पश्चिम - बाबा हांडे
घाटकोपर पूर्व - सुरेश आवळे
मानखुर्द -शिवाजी नगर - अखतर कुरेशी
मालाड पश्चिम - अजित भंडारी
दहिसर - राम यादव
बोरिवली - सचिन म्हात्रे
मागाठाणे - मनोहर देसाई
अंधेरी पश्चिम - राजू पेडणेकर
वर्सोवा - अल्ताफ पेवेकर
दिंडोशी - वैभव भरडकर
गोरेगांव - स्वप्नील टेंबवलकर
अंधेरी पूर्व - मूर्ती पटेल
जोगेश्वरी पूर्व - ज्ञानेश्वर सावंत
वांद्रे पश्चिम, वांद्रे पूर्व, विमानतळ विभाग - कुणाल सरमळकर
चांदिवली - दिलीप लांडे
कलिना - महेश पेडणेकर
कुर्ला - विनोद कांबळे
कुलाबा - गणेश सानप
मलबार हिल - प्रवीण कोकाटे
मुंबादेवी - रुपेश पाटील
भायखळा - विजय लिपारे
वरळी - दत्ता नरवणकर
शिवडी - नाना आंबोले
अणुशक्ती नगर - अविनाश राणे
चेंबुर - तुकाराम काते
सायन कोळीवाडा - मंगेश सातमकर
धारावी - भास्कर शेट्टी
माहीम - भाई परब
वडाळा - सुनील मोरे
प्रभारी विधानसभा प्रमुख
दिंडोशी आणि गोरेगांव - गणेश शिंदे
विलेपार्ले - जितू जनावडे
वांद्रे पश्चिम - विलास चावरी