Apply rigid lockdown throughout at Dharavi | संपूर्ण धारावीत कठोर लाॅकडाऊन लागू करा

संपूर्ण धारावीत कठोर लाॅकडाऊन लागू करा

मुंबई: धारावीतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण धारावीचा परिसर पूर्णतः लॉकडाऊन करण्याची मागणी स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  केली आहे. मुंबईला कोरोनाच्या संकटापासून वाचवायचे असेल तर धारावीत आणखी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. येथील प्रादुर्भाव वेळीच रोखणे आवश्यक असल्याचे शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. 

महाराष्ट्रावरील कोरोनाचा धैर्याने आणि संयमाने सामना मुकाबला सुरू ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे अभिनंदनही शेवाळे यांनी या निवेदनात केले आहे. दाट लोकसंख्येमुळे धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने होऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. या संकटापासून धारावीला आणि पर्यायाने मुंबईला वाचविण्यासाठी धारावीला पूर्णतः लॉकडाउन करावी. तसेच,मुंबई महापालिकेने इथली सर्व रुग्णालये ताब्यात घेऊन कोरोना बाधितांसाठी राखीव जागा तयार कराव्यात. 'धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' चा वापर क्वारंटाईन वॉर्ड म्हणून  करावा. संपूर्ण धारावीचे निर्जंतुकीकरण त्वरित करावे आणि इथल्या सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करावी. लॉकडाऊन काळात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र शिधावाटप व्यवस्था आणि एक स्वतंत्र होम किचन सूरु करावे. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाला धारावीत तैनात करण्यात यावे , अशीही मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे.

याचबरोबरीने, राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःला आणि संपूर्ण मुंबईला कोरोनापासून वाचविण्याचे आवाहन खासदार शेवाळे यांनी धारावीतील जनतेला केले आहे.

 

Web Title: Apply rigid lockdown throughout at Dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.