मुंबई : इयत्ता आठवीत शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून वार्षिक १२ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. त्याकरिता राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा २१ डिसेंबरला संपूर्ण राज्यात परीक्षा होणार आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. शिष्यवृत्तीसाठी १२ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, त्याकरिता राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो.
शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के (तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ५० टक्के) गुण मिळवलेले असावेत. तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख ३५ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे. त्याकरिता तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता, शैक्षणिक अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
दरम्यान, विनाअनुदानित शाळांतील, केंद्रीय विद्यालयातील, जवाहर नवोदय विद्यालयातील, वसतिगृहाच्या सवलतीचा लाभ घेणारे तसेच सैनिकी शाळांतील विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. मात्र, ते शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये, अशी बारा महिन्यांकरिता शिष्यवृत्ती दिली जाते.
विलास जावीर, शिक्षण निरीक्षक, मुंबई
पात्रतेचे निकष
राज्यातील कोणतीही सरकारी, सरकारमान्य खासगी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेतील आठवीतील विद्यार्थी. तीन लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांची मुले.
बौद्धिक क्षमता चाचणी ९० गुण
शालेय क्षमता चाचणी ९० गुण