Join us
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज ‘लॉक’; २३ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 10:38 IST

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरू झाली असून दोन दिवसांत मुंबई विभागातून सव्वादोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ७६ हजार ९८२ विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक झाले आहेत. ३२ विद्यार्थ्यांनी अर्ज मागे घेतले आहेत, तर ९३ हजार ५२० विद्यार्थ्यांचे अर्ज ऑटो व्हेरिफाइड झाले आहेत. 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया या पूर्वीच सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत कोटांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता नियमित केंद्रीय फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत अर्जाचा भाग एक भरता येईल. तर विद्यार्थ्यांना अर्जातील भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम १५ जूनपर्यंत भरता येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे १९ जूनला महाविद्यालयांची प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीतील विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. साधारण २३ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी, १ जुलै ते ९ जुलैदरम्यान तिसरी फेरी, १० ते १८ जुलैदरम्यान विशेष फेरी होणार आहे.

 

टॅग्स :करिअर मार्गदर्शनशिक्षण