अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 10:32 IST2026-01-01T10:31:45+5:302026-01-01T10:32:25+5:30
नवी मुंबई महापालिकेत प्रभाग क्र. ६ मधील शिंदेसेनेच्या उमेदवार प्रियांका साष्टे यांचा अर्ज बाद केला. प्रभाग क्र. १३ मधील रामदास पवळे यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने त्यांचाही अर्ज बाद केला.

अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
ठाणे : महामुंबईतील विविध महापालिकांत संतापजनक कारभार अर्जाच्या छाननीवेळी अनुभवास आला. अनेक महापालिका आयुक्त व निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत नेमके किती व कोणत्या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले, याची माहिती दिली नाही. नवी मुंबईत शिंदेसेनेचे तीन अर्ज बाद झाले, तर पनवेल महापालिकेत शेकाप उमेदवाराचा अर्ज बाद झाला. ठाण्यात सत्ताधारी भाजप व शिंदेसेना या पक्षाच्या सांगण्यावरून महापालिकेच्या यंत्रणेने विरोधकांचे अर्ज बाद केले. मात्र, मनसे व अन्य पक्षांनी आक्षेप घेऊनही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद केले नाही, असा आक्षेप मनसेने घेतला.
नवी मुंबई महापालिकेत प्रभाग क्र. ६ मधील शिंदेसेनेच्या उमेदवार प्रियांका साष्टे यांचा अर्ज बाद केला. प्रभाग क्र. १३ मधील रामदास पवळे यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने त्यांचाही अर्ज बाद केला. त्यांच्या समोरील प्रतिस्पर्धक उमेदवार माजी महापौर सागर नाईक हे आहेत. पनवेलमध्ये भाजप, काँग्रेसचा प्रत्येकी एक अर्ज बाद झाला. प्रभाग ४ क्र. शिल्पा ठाकूर यांचा अर्ज तांत्रिक कारणासाठी बाद झाला. त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपच्या परेशा पटेल या आहेत. प्रभाग क्र. १८ रोहन गावंड यांचा अर्ज तांत्रिक कारणासाठी बाद झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे नितीन पाटील आहेत.
मुंबईत १६७ अर्ज बाद
मुंबईतून अर्ज छाननीत २,२३१ उमेदवार पात्र ठरले असून १६७ अर्ज बाद झाले. छाननी प्रक्रियेत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), आपसह अपक्षांचे अर्ज बाद झाले आहेत. प्रभाग क्रमांक १०७ मधून राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार भरत दनानी यांचा अर्ज बाद झाला. येथे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना उमेदवारी मिळाली आहे. तर जी दक्षिण वॉर्डमधील १९३ ते १९९ प्रभागमधील १२ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हे सर्व अपक्ष उमेदवार आहेत. छाननीत सर्वाधिक अवैध अर्ज एस विभागात (३४) आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
मीरा-भाईंदरमध्ये ६३१पैकी ३० अर्ज तांत्रिक कारणांनी बाद केले असून ६०० अर्ज वैध ठरले. त्यातील दोन ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचा निर्णय प्रलंबित होता. यात प्रभाग २३ मधील भाजप उमेदवार वर्षा भानुशाली व प्रभाग ५चे भाजप उमेदवार प्रियांका करणी चारण यांचा समावेश आहे.
मनसेचा पक्षपाताचा आरोप
ठाणे महापालिकेच्या वागळे येथील निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील यांनी क्रमांक १६, १७ व १८ प्रभागात शिंदेसेनेतील उमेदवारांचे अर्ज अवैध असतानाही त्यांचे अर्ज वैध ठरवून मनसे, उद्धवसेना आणि वंचितच्या उमेदवारांचा अर्ज अवैध ठरवल्याच्या विरोधात बाधित उमेदवारांसह मनसे नेते गुरुवारी आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.
तीन अपत्ये असल्याचे पुरावे द्या
कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक १३ मधील भाजपच्या उमेदवार सरोज मनोज राय यांना तीन अपत्ये असताना त्याचा तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या अर्जावर हरकत उद्धवसेनेचे उमेदवार मथूर म्हात्रे यांनी घेतली. मात्र, विरोधकांनी पुरावे सादर करावे, मगच अर्ज बाद करण्याची भाषा करावी, असे आव्हान भाजपने दिले.
काँग्रेस-सपा कार्यकर्त्यांत हाणामारी
अर्ज छाननीदरम्यान प्रभाग ११ मधील काँग्रेसच्या एका उमेदवारावर तीन अपत्ये असल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी सपच्या उमेदवाराने घेतल्याने वाद झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी झाली.
अवैध बांधकामाचा आक्षेप फेटाळला
भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार राजेश वधारिया व रमेश चव्हाण यांनी अवैध बांधकाम केल्याचा आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन हे आक्षेप फेटाळले. असाच प्रकार मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३१ राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार मोरेश्वर किणे यांच्याबाबत झाला. त्यांच्या अर्जावर राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार सुधीर भगत यांनी आक्षेप घेतला होता.