खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात या स्फोटातील पीडितांच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणारे वकील शाहिद नदीम यांनी लवकरच उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे सांगितले. आम्ही स्वतंत्रपणे अपील दाखल करू, असे ते म्हणाले. आम्ही १७ वर्षे या निकालाची वाट पाहत होतो. पण, आरोपींची मुक्तता ही पीडितांची चूक नाही. त्यांनी केवळ यातना भोगल्या. हे दुःखद आहे, असे ते म्हणाले.
न्यायालयाने आरोपींना संशयाचा फायदा देत निर्णय दिला. तपास यंत्रणा आरोपींना दोषी सिद्ध करण्यात अपयशी ठरली. एटीएस आणि सरकार अपयशी ठरले. पीडितांचा यात काहीही दोष नाही, असे ते म्हणाले.
आयुष्यातील उद्ध्वस्त झालेल्या त्या १७ वर्षांचे काय?
मी मालेगाव कधी पाहिलेही नाही. तरीदेखील मला दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करून अटक केली गेली. धमक्या, अमानुष मारहाण करत गुन्ह्याच्या कबुलीसाठी दबाव आणला. या १७ वर्षांत माझ्यासह माझ्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हे कसे भरून काढणार? असा सवाल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटका झालेले मेजर रमेश उपाध्याय यांनी उपस्थित केला. कोर्टाच्या निर्णयामुळे आमच्यावरील डाग पुसला गेला त्याचा आनंद आहे, असे ते म्हणाले.
उपाध्याय यांनी सांगितले, की ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाला त्या दिवशी मी मुंबईत होतो. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी पोलीस धडकले. त्यांनी माहिती घेतली. दोन दिवसांनी हेमंत करकरेंनी मला कोठडीत घेतले. मारहाण केली. मात्र मी शेवटपर्यंत त्यांची नावे घेतली नाही.