न्यायमूर्तींना व्हॉट्सॲप संदेश पाठवणाऱ्या महिलेचा माफीनामा; न्यायालयाने बजावले, पुन्हा असे करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 06:03 IST2024-12-24T06:03:43+5:302024-12-24T06:03:54+5:30
न्या. एम.एम. साठ्ये यांनी मुलीच्या आईला बजावलेली ‘कारणेदाखवा’ नोटीसही रद्द केली.

न्यायमूर्तींना व्हॉट्सॲप संदेश पाठवणाऱ्या महिलेचा माफीनामा; न्यायालयाने बजावले, पुन्हा असे करू नका!
मुंबई : मुलीच्या ताब्याबाबत खुद्द न्यायमूर्तींना व्हॉट्सॲप मेसेज पाठविणाऱ्या आईने गेल्याच आठवड्यात न्यायमूर्तींची माफी मागितली. न्यायमूर्तींनी माफी स्वीकारत या घटनेची पुनरावृत्ती करू नका, असा इशारा संबंधित महिलेला दिला.
न्या. एम.एम. साठ्ये यांनी मुलीच्या आईला बजावलेली ‘कारणेदाखवा’ नोटीसही रद्द केली. ‘यापुढे कोणत्याही न्यायाधीशांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये, असे न्यायालयाने याचिकाकर्त्याला बजावले. सहा वर्षांच्या मुलीचा ताबा पतीला देण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला संबंधित महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. जिल्हा न्यायालयाने महिलेला मुलीला भेटण्याचा वेळ दिला आणि कॉल करण्याची परवानगी दिली आहे.
उच्च न्यायालयाने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायमूर्तींना एका अज्ञात मोबाइल नंबरवरून व्हॉट्सॲप संदेश आला. न्या. साठ्ये यांनी तो नंबर ब्लॉक केला. त्यांना अन्य एका नंबरवरून एक व्हिडीओ आणि मेसेज पाठविण्यात आला. त्या मेसेज आणि व्हिडीओवरून मेसेज पाठविणारी व्यक्ती आदेश देताना उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी याबाबत चौकशी केली असता महिलेने संदेश पाठविल्याची कबुली दिली.
न्यायालय काय म्हणाले?
‘मुलीचा ताबा मिळविण्यासाठी आईने अशा प्रकारचे पाऊल उचलले. मात्र, तिची कृती अयोग्य आहे. प्रथमदर्शनी संबंधित महिलेने न्याय प्रशासनाच्या कारभारात हस्तक्षेप करण्यासाठी न्यायमूर्तींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
तिचे हे वर्तन न्यायालयाचा अवमान करणारे आहे,’ असे म्हणत न्यायालयाने तिला तिच्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणेदाखवा’ नोटीस बजावली होती. तिने चूक कबूल करून माफी मागितली. न्यायालयाने तिची माफी स्वीकारत यापुढे असा प्रकार करू नये, अशी सूचना केली.