Join us  

आधी माफी मागा! दिपाली सय्यदच्या शिंदे गटातील प्रवेशाला BJP महिला मोर्चाचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:03 PM

दिपाली सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती असं भाजपा महिला मोर्चाने म्हटलं.

मुंबई - आपल्या विधानांनी राजकीय पटलावर कायम चर्चेत असणाऱ्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समोर आले आहे. दिपाली सय्यद मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. परंतु दिपाली सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाने विरोध केला आहे. मागील काळात दिपाली सय्यदविरुद्ध भाजपा महिला मोर्चा वाद चांगलाच रंगला होता. त्यानंतर आता दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येताच त्याला विरोध होताना दिसत आहे. 

भाजपा महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी आणि मीडिया पॅनेलिस्ट दिपाली मोकाशी यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत सय्यद यांनी आधी भाजपाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. दिपाली मोकाशी यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, कथाकथित स्वयंभू नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी वाचली. सय्यदबाईंना सुबुध्दी येण्यास फारच उशीर झाला. परंतु हरकत नाही. दिपाली सय्यद यांनी याआधी प्रसिद्धीपोटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्यारितीने आक्षेपार्ह आणि खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत राज्यपालांना भेटणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी दिल्या होत्या यासाठी दिपाली सय्यद यांनी भारतीय जनता पार्टीची माफी मागावी अशी आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दिपाली सय्यद यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली अशी आमची भावना आहे. त्यामुळे त्या राज्यातील भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना युती सरकारला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्यात. झालं गेलं विसरून जात दिपाली सय्यद यांनी बिनशर्तपणे मा. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री यांची माफी मागावी तसेच महिला मोर्चातील पदाधिकाऱ्यांवरील तक्रारी मागे घ्याव्यात अन्यथा त्यांच्या पक्षप्रवेशाला आमचा विरोध असेल असं दिपाली मोकाशी यांनी म्हटलं आहे. 

सय्यद यांची ठाकरे गटावर टीकास्त्र मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत,” असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला. वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असं सय्यद यांनी म्हटलं होतं. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :दीपाली सय्यदभाजपादेवेंद्र फडणवीस