पक्ष्यांना फरसाण खायला देणार तो जाळ्यात अडकणार, २५ हजारांपर्यंतचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:24 IST2025-03-17T15:23:58+5:302025-03-17T15:24:43+5:30
प्रेक्षणीय स्थळे, उद्याने, तसेच पाणवठ्यांवर देशी-विदेशी पक्ष्यांना पाव, पोळी, फरसाण, भात, शेव, वेफर असे अप्रमाणिक पदार्थ खायला घालणे नियमबाह्य आहे.

पक्ष्यांना फरसाण खायला देणार तो जाळ्यात अडकणार, २५ हजारांपर्यंतचा दंड!
प्रेक्षणीय स्थळे, उद्याने, तसेच पाणवठ्यांवर देशी-विदेशी पक्ष्यांना पाव, पोळी, फरसाण, भात, शेव, वेफर असे अप्रमाणिक पदार्थ खायला घालणे नियमबाह्य आहे. पक्ष्यांना त्यांच्या शरीररचनेच्या विपरीत खाद्य खायला घालून त्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अनेक नागरिक समुद्रकिनाऱ्यांसह घरांच्या खिडक्या, गॅलरीतही पक्ष्यांना असे पदार्थ खायला घालत आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या जीवाला धोका असून असे पदार्थ त्यांना खायला घालू नयेत, असे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.
निसर्ग मित्र विजय अवसने यांनी सांगितले की, सीगल पक्ष्यांना गोण्या भरभरुन शेव, गाठिया टाकण्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी चौपाटीवर सुरू होते. आता पक्ष्यांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. तसेच तिथे कायमस्वरुपी वनरक्षक तैनात केल्याने हा प्रकार बंद झाला आहे. दुसरीकडे अलिबाग, एलिफंटा गुहा येथे जाणाऱ्या लाँचमधून काही प्रवासी सीगल पक्ष्यांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात. सीगल अथावा कोणत्याही पक्षाला अप्रमाणित खाद्यपदार्थ खायला घालणे हा गुन्हा आहे. त्यामुळे हे खाद्यपदार्थ खायला घालू नका, असे जागृती करणारे पोस्टर प्रत्येक लाँचवर लावले आहेत. मात्र, सर्रास या नियमाचे उल्लंघन केले जात आहे. असे प्रकार करणाऱ्यांना शिक्षा नसावी, पाचशे रुपये दंड असावा. तसेच मी पक्ष्यांना खायला टाकणार नाही, असे हमीपत्र लिहून घेऊन त्यांना सोडावे.
दरम्यान, कबुतर, कावळ्यांना दाणे, शेव, गाठीया, खाकरा, वेफर, कुरकुरे, चायनीज भेळेतील शेव असे पदार्थ खाण्यास देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
'हे' पदार्थ हानिकारक
भाकरी- आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव, पचन समस्या निर्माण करते
तांदूळ- पचन समस्या निर्माण करु शकते, कुपोषणास कारणीभूत ठरू शकते.
शेव- मीठ, साखर आणि अस्वास्थ्याकर चरबीचे प्रमाण जास्त
पोळी- असंतुलित आहार, आवश्यक पोषक तत्त्वांचा अभाव
कायदा काय सांगतो?
१. पक्ष्यांना त्यांचे मूळ खाद्य, नसलेले अन्नपदार्थ खाण्यास दिल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
२. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि भारतीय वन कायदा १९८० नुसार पक्ष्यांना कृत्रिम किंवा हानिकारक पदार्थ खायला घालण्यास मनाई आहे.
परिणाम असे...
असंतुलित आहारामुळे कुपोषण होते.
पचन समस्या उद्भवू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
कृत्रिम आहार दिल्याने मृत्यू होऊ शकतो.
२५ हजारांपर्यंत दंड, कारावास
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार नियमांचे उल्लंघन केल्यास २५ हजारांपर्यंत दंड, तीन वर्षांपर्यंत कारावास, तसेच दंड आणि तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
अशी आहेत मुंबईतील पक्षी निरीक्षण स्थळे
ऐरोली खाडी, ठाणे खाडी, भांडुप पम्पिंग स्टेशन, पवई तलाव येथील खारफुटीचे जंगल, सीवूड्स फ्लेमिंगो पॉइंट, सेव्हरी फ्लेमिंगो पॉइंट, कर्नाळा पक्षी अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.