निवडणूक कार्यालय बदलल्याने मनस्ताप; प्रश्नांची उत्तरे देताना सुरक्षारक्षकाच्या नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:02 IST2025-12-25T10:02:39+5:302025-12-25T10:02:51+5:30
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ‘के पूर्व’ व ‘एच पश्चिम’मधील प्रभाग क्रमांक ८२ ते ८५ व ९७ ते १०२ मधील काही इच्छुकांनी अर्ज खरेदी करण्यासाठी वांद्रे पश्चिमेकडील पेटिट महापालिका शाळेतील कार्यालयाकडे धाव घेतली.

निवडणूक कार्यालय बदलल्याने मनस्ताप; प्रश्नांची उत्तरे देताना सुरक्षारक्षकाच्या नाकीनऊ
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अर्जांची विक्री व स्वीकृती प्रक्रियेला मंगळवारी प्रारंभ झाला असताना वांद्रे पश्चिमेकडील ‘के पूर्व’ आणि ‘एच पश्चिम’ या वॉर्डांचे निवडणूक कार्यालय सांताक्रुझमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. याबाबत इच्छुक उमेदवारांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने ते वांद्रे येथे गेल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी ‘के पूर्व’ व ‘एच पश्चिम’मधील प्रभाग क्रमांक ८२ ते ८५ व ९७ ते १०२ मधील काही इच्छुकांनी अर्ज खरेदी करण्यासाठी वांद्रे पश्चिमेकडील पेटिट महापालिका शाळेतील कार्यालयाकडे धाव घेतली. मात्र, प्रत्यक्षात तेथील कार्यालय सांताक्रुझमध्ये स्थलांतरित केल्याची माहिती त्यांना तिथे गेल्यावर मिळाली. अनेक इच्छुक सायंकाळपर्यंत या शाळेत येऊन नंतर सांताक्रुझला गेले.
बुधवारी सकाळी लावला बॅनर
इच्छुकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ शाळेच्या सुरक्षारक्षकावर आली व दिवसभर उत्तरे देऊन तो सुरक्षारक्षक अक्षरशः कंटाळून गेला.
बुधवारी सकाळी या ठिकाणी प्रवेशद्वारावर निवडणूक कार्यालय स्थलांतरित करण्यात आल्याची सूचना देणारे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे सुरक्षारक्षकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पूर्व उपनगरातील भाडुंप येथील एस वॉर्डमध्ये सोमवारी संध्याकाळपर्यंत निवडणूक कार्यालयांची निश्चिती न झाल्यामुळे गोंधळ उडाला होता. निवडणूक कार्यालयांची व्यवस्था शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असल्याने उमेदवारांसह निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही धावपळ झाली.