Join us  

‘तेव्हा’ अनुराग कश्यप भारतात नव्हतेच!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 2:47 AM

लीगल टीम; पुरावे पोलिसांना दिल्याचा दावा

मुंबई : चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्याविरोधात अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. मात्र, पीडितेने ज्या महिन्यात हा प्रसंग घडल्याचे म्हटले आहे, त्यावेळी ते भारतातच नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांच्या लीगल टीमने दिले. याचे कागदोपत्री पुरावेही कश्यप यांनी तपासयंत्रणांना दिल्याचे समजते. पीडित अभिनेत्रीने आॅगस्ट, २०१३ मध्ये कश्यप यांनी तिला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, या दरम्यान चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कश्यप श्रीलंकेत होते. त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असा दावा त्यांच्या लीगल टीमने केला. ही बाब सिद्ध करणारे काही पुरावेही कश्यप यांनी पोलिसांकडे सुपुर्द केल्याचे या टीमच्या प्रमुख प्रियांका खिमानी यांनी मीडिया स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. आपल्या अशीलाला खोट्या आरोपांमध्ये अडकवल्याचा आरोपही त्यांनी केला.

कश्यप यांच्यावर वर्सोवा पोलिसांनी २२ सप्टेंबर, २०२० रोजी दखलपात्र गुन्हा दाखल केला. वर्सोवा पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर, गुरुवारी, १ आॅक्टोबर रोजी ते पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांची जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी आम्ही आवश्यक पुरावे गोळा करत असल्याचे वर्सोवा पोलिसांचे म्हणणे आहे.‘नार्को टेस्ट’ करा!कश्यप भारतात नव्हते, हे त्यांनी पोलिसांना दिलेले उत्तर साफ खोटे आहे. म्हणूनच त्यांची नार्को अ‍ॅनालिसिस टेस्ट, लाय डिटेक्टिंग आणि पॉलिग्राफ टेस्ट करावी, अशी विनंती करणारा अर्ज माझे वकील वर्सोवा पोलिसांना देणार आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येऊन मला न्याय मिळेल, असे टिष्ट्वट अभिनेत्री पायल घोषने केले आहे.

टॅग्स :अनुराग कश्यपगुन्हेगारीपोलिस