जोगेश्वरी टर्मिनसवर आणखी एक प्लॅटफॉर्म; ७६ कोटींचा खर्च, मेल, एक्स्प्रेस थांबणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:11 IST2025-10-27T10:04:45+5:302025-10-27T10:11:05+5:30
जोगेश्वरी हे मुंबईमधले सातवे टर्मिनस ठरणार आहे.

जोगेश्वरी टर्मिनसवर आणखी एक प्लॅटफॉर्म; ७६ कोटींचा खर्च, मेल, एक्स्प्रेस थांबणार
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात असतानाच, आता या प्रकल्पात आणखी एक आयलंड प्लॅटफॉर्म आणि दोन नवीन मार्गिका उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या येथे दोन प्लॅटफॉर्म आणि तीन मार्गिकांचे काम सुरू असून, त्यात वाढ करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
पश्चिम रेल्वेच्या सुरुवातीच्या योजनेनुसार, जोगेश्वरी टर्मिनसमध्ये १ होम आणि एक आयलंड प्लॅटफॉर्म आणि तीन मार्गिकांचा बांधण्याचा समावेश होता. यामध्ये २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. यासाठी ७६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार होते. आता प्रकल्पामध्ये नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्लॅटफॉर्म आणि मार्गिकांसाठी आणखी ५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा प्रकल्प आता दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आला असून, पहिला टप्पा मार्च, तर दुसरा टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
जोगेश्वरी हे मुंबईमधले सातवे टर्मिनस ठरणार आहे. ते सुरू झाल्यानंतर मुंबईच्या उपनगरांतील प्रवाशांसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस गाड्यांची सुविधा मिळणार आहे. यामुळे बोरिवली, मुंबई सेंट्रल, वांद्रे या टर्मिनसवरचा भार कमी होणे अपेक्षित आहे.
असा आहे प्रकल्प
३६.६ कोटी एकूण किंमत
टप्पा १ : २ प्लॅटफॉर्म, ३ मार्गिका
टप्पा २:१ आयलंड प्लॅटफॉर्म, १ शंटिंग मार्गिका १ देखभाल मार्गिका
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर दररोज अंदाजे १२ पेक्षा जास्त मेल, एक्सप्रेस या ठिकाणावरून धावतील. त्यामुळे गोरेगाव, मालाड, अंधेरीमधील प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी वांद्रे, मुंबई सेंट्रलकडे ट्रेन पकडण्यासाठी जाण्याची गरज देखील कमी भासणार असून, त्यांच्या वेळेची देखील बचत होईल.
मुंबईकरांना जोगेश्वरी टर्मिनसच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी नवीन टर्मिनस उपलब्ध होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या ठिकाणी आणखी प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी नुकतेच दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे