Join us  

मुंबई कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अजून एका आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 10:07 PM

कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कमला मिलचा चेअरमन रमेश गोवानीला आज मुंबई पोलिसांनी अटक केली.

मुंबई -  कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. कमला मिलचा चेअरमन रमेश गोवानीला आज मुंबई पोलिसांनी अटक केली. कमला मिलच्या आवारात बेकायदा बांधकाम करणाऱ्या मालक रमेश गोवानीवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.   याप्रकरणी दोन दिवसआधी तिघांना अटक करण्यात आली होती. कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनीचा मालक निर्वाण पांडे आणि एका फायर ब्रिगेडच्या अधिका-याला अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 16 जानेवारी रोजी मोजोस बिस्ट्रो पबचा सहमालक युग तुलीलाही अटक करण्यात आली होती. कमला मिल आग दुर्घटनेनंतर युग तुली हा फरार झाला होता.  या घटनेत 14 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता.   

कोण आहे रमेश गोवानी?रमेश गोवानी कमला मिल्स लिमिटेडचा चेअरमन तर आहेच पण बांधकाम व चित्रपट क्षेत्रातील तब्बल 30 कंपन्यांवर संचालक आहे. पुण्याच्या लोहगाव येथील संरक्षण खात्याच्या जमीन विक्री घोटाळय़ात गोवानीचे नाव आले होते. ३० जुलै २०१२ रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. आर. महाजन यांनी याप्रकरणी गोवानीला नोटीसही बजावली होती. एवढेच नव्हे तर वांद्रे येथे १३ मजली अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी सप्टेंबर २०१६ मध्ये रमेश गोवानीविरुद्ध ‘एमआरटीपी’अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता. गोवानी आणि त्याच्या पार्टनरविरोधात झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणानेच तक्रार केली होती. 

14 जणांचा गुदमरुन मृत्यू   लोअर परळ येथील कमला मिल कम्पाउंडमधील ट्रेड हाउस या इमारतीत लागलेल्या भीषण आगीत ११ तरुणींसह १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री (28 डिसेंबर 2017 ची घटना) ही दुर्घटना घडली. इमारतीतील मोजोस ब्रिस्ट्रो आणि वन-अबव्ह या पब, रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या अग्नितांडवामध्ये २४ महिलांसह ५४ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर पबमालक अभिजित मानकर, रितेश संघवी, जिगर संघवी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना ताब्यात घेतले आहे. तर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.    

कमला मिल दुर्घटनेला पालिका प्रशासनाचा गलथानपणा जबाबदारखाद्यगृहे, पब्स, रेस्टॉरंट, बार यांना घातलेले नियम व अटी ते पाळत आहेत की नाही, याची खात्री करून घेण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले. परिणामी कमला मिलची दुर्घटना घडली, असे म्हणत उच्च न्यायालयाने दुर्घटनेचा ठपका पालिकेच्या गलथान कारभारावर ठेवला. ही घटना समाजासाठी धक्कादायक आहे, असेही सोमवारी न्यायालयाने म्हटले. २९ डिसेंबरला कमला मिल कंपाउंडमधील ‘मोजोस बिस्ट्रो’ व ‘वन अबव्ह’ला लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला. त्यानंतर मुंबईतील खाद्यपदार्थ, रेस्टॉरंट, पब्स, बारचे फायर आॅडिट व्हावे, यासाठी माजी पोलीस आयुक्त जुलियो रिबरो यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. आर.एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे होती. 

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवपोलिस