‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 05:59 IST2025-11-06T05:59:35+5:302025-11-06T05:59:49+5:30
नव्या कोऱ्या मोनो गाडीचे मोठे नुकसान झाले

‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बिघाडसत्राने ग्रासलेल्या मोनोरेलला बुधवारी चाचण्यांवेळी मोठा अपघात झाला. गाडीचा डबा बिमवरून घसरून तीन कर्मचारी जखमी झाले. अपघातात नव्या गाडीचेही मोठे नुकसान झाले. मात्र, नुकसानाच्या तपशीलाबाबत ‘एमएमआरडीए’ने मौन बाळगले आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या गाड्यांची चाचणी सुरू आहे. बुधवारी एक गाडी वडाळा डेपोतून बाहेर पडत असताना सकाळी ९:३०च्या सुमारास अपघात घडला. गाडी ट्रॅक बदलत असताना ती बिमवरून घसरली आणि तिचा एक डबा ट्रॅकवर आला. दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
अपघातात सोहेल पटेल, व्ही. जगदीश आणि बुधाजी परब हे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार करण्यात आले, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. मात्र एमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल यांनी मात्र कोणीही जखमी झाले नाही, असा दावा केला.
बिघाडांच्या सत्रामुळे ग्रासलेल्या संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मोनोरेल मार्गिकेवर बुधवारी चाचण्यांवेळी मोठा अपघात झाला. यात मोनो गाडीचा डब्बा बिमवरून घसरला. यात तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून नव्या कोऱ्या मोनो गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोनो मार्गिकेवर नव्याने दाखल गाड्यांची चाचणी सुरू आहे. त्यानुसार बुधवारी चाचणी सुरू होती. एक मोनो रेल वडाळा डेपोतून बाहेर पडत असताना सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
मोनो रेल ट्रॅक बदलत असताना बिमवरून घसरली. या मोनो गाडीचा एक डब्बा ट्रॅकवर आला. रात्री उशीरा मोनोचा डब्बा क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.
बिघाडाचे सत्र सुरूच
७ जुलैला या मार्गावर गाडी अर्धा तास बंद पडल्याने सेवा विस्कळीत झाली होती.
१९ ऑगस्टला मोनो गाडी एका बाजूला झुकल्याने दोन गाड्या बंद पडल्या होत्या.
१५ सप्टेंबरला वडाळा आणि जीटीबीनगर स्थानकादरम्यान मोनो बंद पडली होती.
बिघाडांची मालिका सुरूच
मोनो रेल मार्गावर पावसाळ्यापासून बिघाडांचे सत्र सुरू आहे. ७ जुलैला गाडी अर्धा तास बंद पडली होती. तर १९ ऑगस्टला गाडी एका बाजूला कलल्याने दोन गाड्या बंद पडल्या होत्या. त्यावेळी ११०० हून अधिक प्रवाशांना उतरवण्याची वेळ एमएमएमओसीएलवर आली होती. त्यानंतर वडाळा आणि जीटीबीनगर स्थानकादरम्यान १५ सप्टेंबरला गाडी बंद पडली होती. त्यावेळी दुसरी गाडी बोलावून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते.
एमएमएमओसीएल म्हणते, किरकोळ घटना
महामुंबई मेट्रो संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) चाचण्यांदरम्यान किरकोळ घटना घडल्याचे म्हटले आहे. परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली. कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. ही चाचणी संपूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित परिसरात सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडण्यात आली. या चाचण्यांचा उद्देश तांत्रिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीत प्रणालीची प्रतिक्रिया तपासणे हा होता. त्यामुळे नियंत्रित परिस्थितीत अशा चाचण्या घेणे, हा प्रक्रियेचा नियमित भाग आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.