Anonymous call for coronary patient interrogation | कोरोनाबाधित रुग्णाच्या चौकशीसाठी निनावी कॉल

कोरोनाबाधित रुग्णाच्या चौकशीसाठी निनावी कॉल

गौरी टेंबकर-कलगुटकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘मैं कलकत्ता इस्लामिक सेंटर से बात कर रहा हू, अभी पेशंट की तबीयत कैसी है, डिस्चार्ज मिला क्या?’ अशी चौकशी करणारा एक फोन (+911075)वरून दहिसरमधील एका वृद्धाला आला. मात्र तुम्हाला आमची माहिती कोणी दिली, याबाबत चौकशी केल्यानंतर तो फोन डिस्कनेक्ट करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असा कोणताही क्रमांक पालिकेकडून देण्यात आले नसल्याचे आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असल्याने रुग्णाची माहिती उघड कशी झाली याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.


एका नामांकित कंपनीतून निवृत्त झालेल्या आणि दहिसरमध्ये राहणाºया या चौसष्ठ वर्षीय अधिकाºयाच्या पत्नीचा २३ मे, २०२० रोजी गोरेगावच्या लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर २६ मे, २०२० रोजी त्यांना दुपारी पावणेचारच्या सुमारास (+911075) या क्रमांकावरून फोन आला.
फोन करणाºयाने तो कलकत्ता येथील इस्लामिक इन्स्टिट्यूटमधून बोलत असून तुमच्या पत्नीची तब्येत आता कशी आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला का? अशी चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र अनोळखी आवाज असल्याने या वृद्धाने आपणाला याबाबत माहिती कुठून मिळाली, अशी विचारणा केल्यानंतर कॉलरने हा फोनच डिस्कनेक्ट केला.


त्यामुळे हे सगळे संशयित प्रकरण त्यांनी आपल्या नातेवाइकांना सांगितले आणि इंटरनेटवर तो क्रमांक त्यांच्या घरच्यांनी तपासून पाहिला. तेव्हा तो क्रमांक ‘कोविड-१९’ या नावाने सेव्ह असल्याचे त्यांना समजले, तसेच अद्याप जवळपास ४६६ जणांनी त्याला स्पॅममध्ये वर्ग केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. ही बाब ‘लोकमत’ला समजल्यानंतर पालिकेच्या १९१६ या नियंत्रण कक्षावर फोन करून त्याची शहानिशा करण्यात आली. मात्र मुंबईसाठी असा कोणताही क्रमांक पालिकेकडून देण्यात आला नसल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. रुग्ण अथवा त्याच्या नातेवाइकांची चौकशी किंवा काही मार्गदर्शन करायचे असल्यास स्थानिक वॉर्डच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांना थेट फोन करण्यात येतो, अशीही माहिती त्यांनी दिली.


रुग्णाची माहिती उघड झाल्याबाबत तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. मात्र तरीही हा इंटरनेट कॉल असल्याची शक्यता असून या क्रमांकाची माहिती मिळविणे अशक्य असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे वृद्धाला अशा प्रकारे फोन करणारे हे लोक कोण आहेत? तसेच कोविड रुग्णाची गुप्त माहिती त्यांना कशी मिळाली, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबईसाठी ‘१९१६’ हाच क्रमांक
कोरोनाबाबत चौकशी किंवा काहीही मदत हवी असेल तर त्यासाठी मुंबईकरांनी ‘१९१६’ या क्रमांकावरच फोन करावा. त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही वेगळा हेल्पलाइन क्रमांक आम्ही कोविडसंदर्भात दिलेला नाही.
- महेश नार्वेकर, आपत्कालीन
विभाग प्रमुख, मुंबई महानगरपालिका

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anonymous call for coronary patient interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.