Join us

परब-सोमय्या वाद पेटला! ठाकरे गटाचे शिवसैनिक म्हाडाच्या कार्यालयात घुसले, परबही जाब विचारायला पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 14:15 IST

अनिल परब यांच्याशी निगडीत कार्यालयावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद पेटला आहे.

मुंबई-

अनिल परब यांच्याशी निगडीत कार्यालयावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता किरीट सोमय्या आणि अनिल परब यांच्यातील वाद पेटला आहे. म्हाडा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसैनिक थेट वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात घुसले आहेत. कार्यालयात जोरदार राडा सुरू असून पोलीस कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यकर्त्यांच्यापाठोपाठ आता अनिल परब देखील म्हाडा कार्यालयात पोहोचले आहेत. 

म्हाडा आणि किरीट सोमय्यांविरोधात जोरदार निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनिल परब यांनी म्हाडाच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसण्यास सांगितलं आहे. जोवर म्हाडाचे अधिकारी उत्तर देत नाहीत तोवर कार्यालया बाहेर बसून राहणार असल्याची भूमिका अनिल परब यांनी घेतली आहे. 

अनिल परब यांनी आज ज्या ठिकाणी पाडकाम केलं गेलं त्याच ठिकाणाहून पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरण सांगितलं. यात ज्या सोसायटीमध्ये कार्यालय होतं ते म्हाडानं पाडलेलं नसून म्हाडानं बांधकाम रेग्युलराइज करण्यास नकार दिल्यानं सोसायटीनंच पुढाकार घेऊन ते पाडलं असल्याचं परब यांनी सांगितलं. तसंच संबंधित कार्यालय आपलं नसून ते सोसायटीचं कार्यालय होतं. आपला जन्मच या सोसायटीमध्ये झाल्यानं नागरिकांनीच सोसायटीच्या जागेत कार्यालय सुरू करायला सांगितलं होतं. त्यामुळे आज गरीबांच्या घरावर पाडकामाची वेळ आली आहे आणि पाडकाम पाहायला येणारे सोमय्या हे काय म्हाडाचे मुकादम आहेत का? असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. 

सोमय्यांनी केलेल्या तक्रारीवर म्हाडा तातडीनं दखल घेतं. पण नारायण राणेंच्या बंगल्याबाबत अधिकारी शांत कसे? असा सवाल उपस्थित करत याचा जाब म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारणार असल्याचं अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी म्हाडाचं कार्यालय गाठलं. त्यापाठोपाठ आता अनिल परबही म्हाडाच्या कार्यालयात पोहोचले असून पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू आहे.

टॅग्स :अनिल परबकिरीट सोमय्या