Join us  

Anil Deshmukh Resign : 'हे जनतेच्या मनातलं सरकार नाही, हे सव्वा वर्षानंतर जनताच अनुभवतेय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 4:22 PM

Anil Deshmukh Resign : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे

ठळक मुद्दे या राज्यात प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, कुणालाही देणंघेणं नाही, म्हणून राज्यातील जनता भरडली जातेय, अशी टीका फडणवीस यांनी केली. 

मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चुप्पीवरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राजीनामा झाला असला तरी, सरकारवर गंभीर आरोप लागले तरी, राज्याचे मुख्यमंत्री यावर चकार शब्दही का बोलत नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. तसेच, जनतेच्या मनातलं सरकार म्हणाऱ्यांना हे सरकार जनतेच्या मनातलं नसल्याचं सिद्ध झालंय, असेही त्यांनी म्हटले.  

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप लावले होते, या आरोपावरून अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणावर अँड. जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणात सीबीआयला १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची आता सीबीआय चौकशी होणार असल्याने महाविकास आघाडी सरकारवर नामुष्की ओढावली आहे. आपण राजीनामा दिल्याचे स्वत: अनिल देशमुख यांनी ट्विट करुन सांगितले. त्यानंतर, फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

हिंदीमध्ये एक म्हण आहे, बूँद से गयी- ओ हौद से नही आती... अशी एक म्हण आहे, अगदी तेच इथं दिसून येतंय. याप्रकरणात ज्याप्रमाणे पाठराखण करण्यात आली, विशेष म्हणजे शरद पवारांनी घेतलेल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर जी नामुष्की ओढवली, ती कुठल्याही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर येता कामा नये. आता, हे सरकार जनेतच्या मनातलं नाही, हे जनताच अनुभवतेय, असे फडणवीस यांनी म्हटलंय. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, जनतेच्या मँडेटला धोका देऊन हे सरकार आलेलंय. तीन चाकी सरकार असून याची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चाललीय. त्यामुळे, मी जे म्हणत होतो, त्याचा अनुभव 1 ते सव्वा वर्षानंतर जनता घेतेय, असे फडणवीस यांनी म्हटलं. या राज्यात प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, कुणालाही देणंघेणं नाही, म्हणून राज्यातील जनता भरडली जातेय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 

गृहमंत्र्यांनी शेअर केलं राजीनामा पत्र

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपाने पुन्हा एकदा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी लागल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, शरद पवार, अजित पवार आणि अनिल देशमुख यांची सिल्व्हर ओक बैठक झाली, यात देशमुखांनी गृहमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली त्याला शरद पवारांनीही ग्रीन सिग्नल दिला. या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन, आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देत असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी राजीनाम्याचे पत्रही शेअर केले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअनिल देशमुखउद्धव ठाकरेसरकार