संतप्त विद्यार्थ्यांचा ‘आयडॉल’ला घेराव; दोषींवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 03:32 IST2020-10-07T03:31:29+5:302020-10-07T03:32:16+5:30
अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडथळे

संतप्त विद्यार्थ्यांचा ‘आयडॉल’ला घेराव; दोषींवर कारवाईची मागणी
मुंबई : आयडॉलची परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. मंगळवारी दुसऱ्या पेपरवेळीही अशाच प्रकारे तांत्रिक बिघाड झाला आणि काही विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी विद्यापीठाच्या कालिना संकुलातील आयडॉल विभागला धडक दिली.
आर्ट्स, कॉमर्सच्या अंतिम वर्षाची आॅनलाइन परीक्षा मंगळवारी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान होती. मात्र, विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आल्या. काहींना लिंक मिळाली नाही, तर काही ठिकाणी कॉस्ट अकाउंटचा पेपर असताना विद्यार्थ्यांचा लिंकवर एक्स्पोर्ट मार्केटिंगचा पेपर आला.
विद्यापीठाच्या हेल्पलाइनवर मदत मागितली असता प्रतिसादच न मिळाल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. अखेर सुमारे ७०० ते ८०० संतप्त विद्यार्थ्यांनी दुपारी कालिना संकुलातील आयडॉलला घेराव घातला. त्यावेळी रद्द झालेल्या परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करू, असे आयडॉलने सांगितले. परंतु प्रत्येक वेळी परीक्षेसाठी सुट्टी मिळणार नाही. यापुढे तांत्रिक अडचण आल्यास उत्तीर्ण करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
विद्यार्थी, पालक संघटना आक्रमक
नेहमी तांत्रिक कारणे देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करणाºया आयडॉलमध्ये कोणते सॉफ्टवेअर आहे याची, तसेच या सर्व प्रकारांची उच्चस्तरीय समिती नेमून राज्यपाल/सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुक्ता शिक्षक संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी केली. मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करून विद्यापीठाला जाब विचारणार असल्याचे युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले. तर, असे प्रकार विद्यार्थी गळतीस कारणीभूत असल्याचे विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी सांगितले. मनविसेच्या शिष्टमंडळाने प्रकुलगुरूंसोबत बैठक घेऊन जाब विचारला. मोठ्या कामाचा अनुभव नसलेल्या खासगी एजन्सीची नेमणूक तत्काळ रद्द करावी. परीक्षा पुन्हा घेण्याऐवजी सरसकट पास करावे, एजन्सीला मोबदला देऊ नये, अशी मागणी केल्याची माहिती उपाध्यक्ष संतोष धोत्रे यांनी दिली.