अंगणवाडी कर्मचा-यांचा संप चिघळला, मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 19:27 IST2017-09-18T19:24:28+5:302017-09-18T19:27:25+5:30
गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला आहे.

अंगणवाडी कर्मचा-यांचा संप चिघळला, मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला
चेतन ननावरे
मुंबई, दि. 18 : गेल्या आठ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा मानधनवाढीचा प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळला आहे. तरी उद्या यासंदर्भात पुन्हा प्रस्ताव तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, महिला व बाल विकास सचिव आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक दुपारी १२ वाजता मंत्रालयात पार पडणार आहे. परिणामी, तूर्तास तरी संप चिघळल्याची चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात कृती समितीचे नेते दिलीप उटाणे यांनी सांगितले की, महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दुपारी ३ वाजता चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहावर तातडीची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी महिला व बाल विकास विभागाने पाठवलेला प्रस्ताव वित्त विभागाकडून फेटाळण्यात
आल्याची माहिती दिली. शिवाय उद्या तातडीने दुसरा प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन करत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कृती समितीने घेतली आहे. याआधी महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना १० हजार ५०० आणि मदतनीसांना ८ हजार रुपये मासिक मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याची तरतूदही करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावानुसार अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनासाठी शासनाला वर्षाला १ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार होती. एवढा बोजा सरकारला झेपणार नसल्याचे सांगत वित्त विभागाने हा प्रस्ताव फेटाळल्याचे उटाणे यांनी सांगितले.