अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीनंतर ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:21 IST2017-10-06T14:47:24+5:302017-10-06T15:21:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी कृति समितीला बैठकीसाठी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) याठिकाणी निमंत्रित केले आहे. संध्याकाळी 5 ही बैठक होणार आहे.

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीनंतर ठरणार आंदोलनाची पुढील दिशा
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी कृति समितीला बैठकीसाठी वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) याठिकाणी निमंत्रित केले आहे. आज संध्याकाळी 5 ही बैठक होणार आहे. त्यामुळे मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेले जेलभरो आंदोलन तुर्तास रद्द करण्यात आले आहे. मात्र ही बैठक फिस्कटली तर 10 ऑक्टोबरचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत पार पाडू, असा इशारा कृती समितीने दिला आहे.
कसं असणार 10 ऑक्टोबरचे आंदोलन?
येत्या 10 ऑक्टोबरला अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला एक महिना पूर्ण होत आहे. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर 10 ऑक्टोबरपासून मुंबईत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीनं घेतला आहे. या दिवशी मंत्रालयालाच्या दिशेने हजारो अंगणवाडी महिला कर्मचारी कूच करतील व जिथे अडवले जाईल तिथेच रस्त्यावर दिवसरात्र ठाण मांडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असे कृती समितीने जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांत तोडगा काढतो, असा शब्द शिवसेना गटनेते व मंत्री रामदास कदम यांना दिला परंतु हा शब्द पाळला गेला नाही. 5 ऑक्टोबरला 50 हजारांहून जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेल भरो आंदोलनात सहभाग नोंदवला. तरीही अजून सरकार या संपाला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे.
अंगणवाडी सुरू असताना त्यांना महिनो न् महिने भेटी न देणारे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी संप मोडून काढण्यासाठी गावोगावी नोटीस घेऊन फिरत आहेत. एकट्या दुकट्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गाठून धमकावत आहेत,अशा परिस्थितीत संप निर्धाराने सुरू ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.