अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 21:47 IST2025-09-29T21:46:56+5:302025-09-29T21:47:22+5:30
महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना या संदर्भात पत्र पाठवून मांडली भूमिका

अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
मुंबई: अंधेरी पश्चिम वीरा देसाई मार्गावरील शहाजी राजे क्रीडा संकुल (अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स)च्या उन्नतीकरणासाठी मुंबई महापालिकेने प्रस्तावित केलेला सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी)चा प्रस्ताव रद्द करून, हा प्रकल्प महापालिकेने स्वतःच्या निधीतून आणि नियंत्रणाखाली राबवावा. उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना या संदर्भात पत्र पाठवून आपली भूमिका मांडली.
शेट्टी यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, "पूर्वी आर्थिक तुटवड्याच्या काळात पीपीपी मॉडेलचा अवलंब गरजेचा होता. मात्र आज, देशातील सर्वात मोठी आणि सक्षम महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिकेचा ५९,००० कोटी रुपयांचा भक्कम वार्षिक अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत केवळ ५ कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासाठी पीपीपी वर अवलंबून राहणे हे पालिकेच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या पार्श्वभूमीवर पुढाकाराची गरज
"मुंबईसारख्या महानगरात आजतागायत एकही आधुनिक, सर्वसमावेशक, महापालिकेच्या ताब्यातील क्रीडा संकुल नाही, हे चिंताजनक आहे," असेही शेट्टी यांनी नमूद केले. भारत सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा धोरण २०२५ अंतर्गत २०३६ ऑलिम्पिक आणि २०४७ पर्यंत भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टात मुंबईचा वाटा महत्त्वाचा असून, त्यासाठी पालिकेने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही शेट्टी म्हणाले.
उत्तर मुंबईसाठी मागणी
"फक्त अंधेरीतच नव्हे, तर उत्तर मुंबईमध्येही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक भव्य क्रीडा संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.उत्तर मुंबईतील युवकही विविध क्रीडा प्रकारांमध्ये पुढे आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी असे संकुल उपयुक्त ठरेल,” असे ते म्हणाले. या संकुलात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, पिकलबॉल/पॅडल कोर्ट्स यांसारख्या खेळांसाठी आधुनिक सुविधा तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाचे केंद्र असावे, अशी सूचना त्यांनी पत्रात केली आहे. “महापालिकेने हा प्रकल्प थेट राबविल्यास पारदर्शकता, कार्यक्षमतेसह जनतेचा विश्वासही जिंकता येईल. तसेच इतर शहरे आणि महापालिकांसाठी एक आदर्श निर्माण होईल," असा विश्वासही शेट्टी यांनी व्यक्त केला.