फॅन्सी नंबर विक्रीतून अंधेरी आरटीओ ‘करोडपती’; वर्षभरात मिळाला १२ कोटी ७१ लाखांचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:21 IST2025-04-29T09:20:40+5:302025-04-29T09:21:21+5:30
कधीकधी एक पेक्षा अधिक लोकांना ०००१, ९९९९, ८०८०, ४१४१ अशा क्रमांकांची एकत्र मागणी केल्यास त्यासाठी बोलीदेखील लावण्यात येते.

फॅन्सी नंबर विक्रीतून अंधेरी आरटीओ ‘करोडपती’; वर्षभरात मिळाला १२ कोटी ७१ लाखांचा महसूल
मुंबई : अंधेरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७ हजार ४१० वाहनधारकांनी फॅन्सी नोंदणी क्रमांक विकत घेतला आहे. या माध्यमातून अंधेरी आरटीओला १२ कोटी ७१ लाख ८७ हजारांचा महसूल मिळाला आहे.
आपल्या वाहनाच्या नंबर प्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बऱ्याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा ‘फॅन्सी नंबर’ जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा अनेकांचा समज असतो. त्यामुळे आपल्या वाहनाच्या नोंदणीसाठी आवडत्या आणि आकर्षक क्रमांकासाठी शौकिनांकडून लाखांमध्ये खर्च करण्यात येतात. यासाठी एक प्रकारची स्पर्धाच पहायला मिळत असते.
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
कधीकधी एक पेक्षा अधिक लोकांना ०००१, ९९९९, ८०८०, ४१४१ अशा क्रमांकांची एकत्र मागणी केल्यास त्यासाठी बोलीदेखील लावण्यात येते. यामधून परिवहन विभागाला अधिकचा महसूल प्राप्त होतो. आरटीओने सप्टेंबर २०२४ मध्ये फॅन्सी क्रमांकाच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ केली होती.
आता असा खरेदी करा ऑनलाइन चॉइस क्रमांक
फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करावे.
उपलब्ध असलेल्या चॉईस क्रमांकांमधून आवडीचा क्रमांक निश्चित करा.
त्याचे पैसे ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या मदतीने लागतील.
ई-पावतीची प्रिंट काढून वाहन विक्रेत्याकडे सादर करणे.
या शहरात सहा लाख रुपये मोजावे लागतात
ज्यामध्ये ०००१ या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. मात्र या क्रमांकाला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फॅन्सी नंबर खरेदीची प्रक्रिया झाली सोपी
नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी आवडीचा क्रमांक हवा असल्यास त्याची संकेतस्थळावर पडताळणी करून त्याचे आरक्षण आणि पैसे भरण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये जावे लागत होते. आता ही सेवा ऑनलाइन करण्यात आली आहे.
चॉईस क्रमांक मिळविण्यासाठी फॅन्सी परिवहन या संकेतस्थळावर जाऊन आधार सोबत लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरील ओटीपीच्या मदतीने आपला पसंतीचा क्रमांक आरक्षित करता येणार असून, त्याचे पैसेदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत.
एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यावर त्यासाठी लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली असून, त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाइन पावती देण्यात येते.