अंधेरी फ्लायओव्हर जाम; मुंबईकर अडकले कोंडीत वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 06:58 IST2024-12-22T06:57:55+5:302024-12-22T06:58:04+5:30
पोलिस हतबल; वाहनचालकांचा संताप

अंधेरी फ्लायओव्हर जाम; मुंबईकर अडकले कोंडीत वाहतूक
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी फ्लायओव्हरसह आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर शनिवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून वाहतूककोंडी झाली होती. यामुळे मुंबईकर या वाहतूककोंडीत तब्बल दीड ते दोन तास अडकून पडले होते. विशेषतः अंधेरी फ्लायओव्हरवर मुंबईकडे येणाऱ्या दिशेने एकामागोमाग वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री नऊनंतर ही कोंडी फुटण्यास सुरुवात झाली असली, तरी दरम्यानच्या काळात वाहतूक पोलिसांसह कोणत्याच यंत्रणेला ही कोंडी फोडता न आल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.
शनिवारी अंधेरी फ्लायओव्हरवर झालेल्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना घाम फोडला. वाहतूककोंडीत अडकलेल्या अपर्णा पाडगावकर म्हणाल्या, वेस्टर्न एक्स्प्रेस हाय वेवरील अंधेरी फ्लायओव्हरवरील वाहतूककोंडीत मी अडकून पडले. चारही बाजूला गाड्या होत्या. उत्तरेकडे जाणारी वाहने सुरळीत जात होती. मात्र, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने
अडकून पडली होती. दहिसरकडून वांद्रेकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या एकामागोमाग एक उभ्या होत्या. अनेक नागरिक वाहनातून उतरून चालत जात होते. रात्री ९ पर्यंत कोंडी कायम होती. दरम्यान, रात्री ९ नंतर उलट दिशेने म्हणजे मुंबईबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाल्याचे चित्र होते.
बाइक रॅलीमुळे कोंडी?
मुंबई पालिका आणि वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत विचारले असता, संबंधितांनी सांगितले की, या परिसरात काढण्यात आलेल्या बाइक रॅलीमुळे वाहतूककोंडी झाली होती. कोंडी फोडण्यासाठी अतिरिक्त्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.