Andheri East Bypoll Election Result : "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 14:47 IST2022-11-06T14:40:18+5:302022-11-06T14:47:58+5:30
Andheri East Bypoll Election Result 2022 And Rutuja Latke : "रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे."

Andheri East Bypoll Election Result : "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा"; ऋतुजा लटकेंनी बोलून दाखवली खंत
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "हा विजय माझा नाही, पती रमेश लटकेंचा" असं म्हणत ऋतुजा यांनी मनातील खंत बोलून दाखवली. "माझ्या मनात एक खंत आहे... माझं हे दु:ख आहे की, मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागत आहे" असं म्हटलं आहे.
"सर्वप्रथम मी म्हणेण हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांची जी संपूर्ण राजकीय कारकीर्द होती त्यामध्ये जी जनसेवा केली, विकासकामे केली. त्याची पोचपावती ही विजयाने मिळालेली आहे. मतदारांनी त्याची एक परतफेड ही केलेली आहे" असं ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे. यासोबतच निवडणुकीत नोटांचा जास्त प्रचार झाल्याच्या मुद्य्यावर बोलताना त्यांनी "नोटाचा प्रचार हा म्हणजे त्यांनी (भाजपाने) जरी उमेदवारी मागे घेतली होती, तरी लोकांना सांगण्यात आलं आणि आपल्याकडे व्हिडिओ क्लिपही आल्या आहेत की तुम्ही नोटाला मतदान करा."
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन! https://t.co/bye1USjuiO
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) November 6, 2022
"लटके यांची जी कामे अर्धवट राहिली ती पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता"
"नोटाचा असा प्रचार होत नसतो नोटा म्हणजे तुम्हाला कुठलाही पक्ष मान्य नाही, तेव्हा तुम्ही नोटाचं बटण दाबू शकता. त्यामुळे ही पूर्णपणे जबाबदारी मतदारांची होती आणि हा प्रश्न मतदारांना विचारला पाहिजे की, त्यांनी नोटावर का मतदान केलं?" असं म्हटलं आहे. तसेच "रमेश लटके यांची जी कामे अर्धवट राहिली आहेत, ती कामे पूर्ण करण्यास माझी प्राथमिकता असणार आहे. याशिवाय त्यांचा जो अंधेरीचा जास्तीत जास्त विकासाचा ध्यास होता, त्यानुसार काम करणार आहे. मी सर्व जनतेचे आभार मानते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात याशिवाय या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी घेणारे अनिल परब या सर्वांचे मी मनापासून आभार मानते" असंही सांगितलं.
शाहुवाडीच्या सुनबाई झाल्या अंधेरीच्या आमदार; ऋतुजा लटकेंच्या विजयाने तालुक्यात आनंदोत्सव
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांच्या या मोठ्या विजयाने अखेर शाहूवाडी तालुक्याच्या सुनबाई अंधेरी पूर्व मतदारसंघांच्या आमदार झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर तालुक्यातील शिवसैनिकांसह, जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सरुड, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर, येळवणजुगाई, शेंबवणे आदी परिसरात शिवसैनिकांसह, लटके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. श्रीमती ऋतुजा लटके या मुळच्या शाहूवाडी तालुक्यातील शेबंवणे पैकी धुमकवाडी येथील आहेत.