मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ‘मेट्रो ७’ मार्गिकवरून आतापर्यंत २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही मेट्रो २ एप्रिल २०२२ ला सुरू झाल्यानंतर ३९ महिन्यांनी हा टप्पा गाठला आहे. दोन्ही मार्गिकांवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून, १५ जुलैला ३ लाख ११ हजार प्रवाशांचा नवा उच्चांक गाठला होता. प्रवासी संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आता प्रवाशांची मेट्रोच्या प्रवासाला पसंती वाढताना दिसत आहे. दर महिन्याला ४ ते ५ टक्के दराने वाढणारी प्रवासीसंख्येमुळे मुंबईकर अधिक स्मार्ट हाेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. मेट्रोवर विश्वास ठेवत आपला प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणस्नेही करण्याची निवड केली, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी नमूद केले.
१५ जुलैला गाठला नवा उच्चांक मेट्राे सेवा सुरू झाल्याने मुंबईकरांसह आजूबाजूच्या शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी १५ जुलै राेजी प्रवासी संख्येने नवा उंच्चाक गाठल्याचे स्पष्ट झाले आहे.
कधी किती प्रवासी पार केले?मेट्रो मार्गिका सुरू झाली त्यादिवशी २ एप्रिल २०२२ रोजी १९,४५१ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता.या दोन्ही मेट्रोवर मिळून प्रवासी संख्येचा १ कोटी प्रवाशांचा आकडा पार करण्यासाठी ९ महिन्यांचा कालावधी लागला. २७ जानेवारी २०२३ हा टप्पा पार केला. प्रवासी संख्या २८ मे २०२४ ला १० कोटींवर पोहचली. मेट्रो सुरू झाल्यापासून २५ महिन्यांनी हा टप्पा गाठला. त्यानंतर पुढील आठ महिने म्हणजेच ४ जानेवारी २०२५ ला मेट्रो सुरू होऊन ३३ महिने उलटल्यानंतर प्रवासी संख्या १५ कोटींवर गेली.