अंधेरी पुलाच्या खर्चाचे जड झाले ओझे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 21:38 IST2024-04-23T21:38:07+5:302024-04-23T21:38:22+5:30
एमएमआरडीएकडून हस्तांतरित झालेल्या पुलांची जबाबदारी पालिकेकडे आल्यानंतर या पुलांच्या देखभालीसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे.

अंधेरी पुलाच्या खर्चाचे जड झाले ओझे
जयंत होवाळ, मुंबई : मुंबईतील उड्डाणपूल आणि त्यांची डागडुजी मुंबई महापालिकेपुढे चांगलीच डोकेदुखी ठरू लागली आहे. अंधेरीचा गोखले पूल , दादरचा टिळक पूल या दोन पुलांच्या बांधकामामुळे पालिकेला टीका सहन करावी लागत आहे. भरीस भर म्हणून आता पुलांच्या बांधकामाच्या अवाढव्य खर्चाची भर पडली आहे. एमएमआरडीएकडून हस्तांतरित झालेल्या पुलांची जबाबदारी पालिकेकडे आल्यानंतर या पुलांच्या देखभालीसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पूल आधी एमएमआरडीएच्या ताब्यात होते. त्यानंतर ते पालिकेकडे हस्तांतरित झाले. त्यापूर्वी एमएमआरडीए पुलांच्या देखभालीचा खर्च उचलत होते. आता खर्चाची बाब पालिकेकडे आली आहे. अंधेरी पूर्वेकडील उड्डाणपुलाची दुरुस्ती पालिका करणार आहे. त्यासाठी तब्ब्ल १०० कोटी रुपये खर्च होणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी याच महिन्यात निविदा मागवण्यात आल्या आहेत. दुरुस्तीसाठी एवढा खर्च येणार असल्याने यापूर्वी एमएमआरडीएने या पुलाची डागडुजी केली होती की नव्हती, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
२००४ साली अंधेरी उड्डाणपूल ते जेव्हीएलआर जंक्शनपर्यंत डांबरीकरणाचे काम तेवढे झाले होते. त्यासाठी २४ कोटी रुपये खर्च केले होते. हे काम एमएमआरडीएमी केले होते. डांबरीकरणा व्यतिरिक्त दुरुस्तीची अन्य कामे झालेली नाहीत. हा पूल युती सरकारच्या काळात बांधण्यात आला होता. गोल्डस्पॉट, चकालासह एकूण तीन सिग्नल पार करणारा हा मोठा पूल आहे. एमएमआरडीएकडून पूल ताब्यात घेतल्यानंतर पालिकेच्या पूल विभागाने पुलाचे सर्वेक्षण करून बेअरिंगसह अन्य कामे सुचवली आहेत .