... अन् हिंदू महासभा रुग्णालयातील ६० रुग्णांचे प्राण वाचले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:03 PM2021-04-21T23:03:07+5:302021-04-21T23:03:31+5:30

महापालिकेकडून तात्काळ ऑक्सिजनचा पुरवठा

Andh Mahasabha Hospital saved the lives of 60 patients in mumbai ghatcoper | ... अन् हिंदू महासभा रुग्णालयातील ६० रुग्णांचे प्राण वाचले

... अन् हिंदू महासभा रुग्णालयातील ६० रुग्णांचे प्राण वाचले

googlenewsNext

मुंबई - घाटकोपर येथील हिंदू महासभा या खासगी रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने एकच धावपळ उडाली. ऑक्सिजनवर असलेले ५० तर व्हेंटिलेटरवरील ११ कोविड रुग्णांचे प्राण कंठाशी आले. आपत्ती काळात मदतीसाठी रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिकेला संपर्क केला. त्यानुसार पालिकेच्या पथकाने नऊ जंबो सिलेंडरची जुळवाजुळव करीत रुग्णालयात सायं. ६.१५ वाजता पोहचवले. त्यामुळे रुग्णालयातील साठा संपण्यास काही मिनिटे उरली असताना ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आणि रुग्णांचे प्राण वाचले. 

ऑक्सिजन पुरवठा संपत आल्याने पालिकेच्या सहा रुग्णालयांमधील १६८ कोविड रुग्णांना रात्रीच्या वेळेत अन्य रुग्णालयांमध्ये हलवण्याची वेळ महापालिकेवर आली होती. अशी वेळ पुन्हा येऊन नये यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी,  अन्न व औषध प्रशासन, प्राणवायू पुरवठादार यांच्याशी समन्वय राखण्यासाठी सहा समन्वय अधिकाऱ्यांची २४ तास नियुक्ती केली आहे. तसेच पालिकेने नेमलेली पथके ऑक्सिजनचे उत्पादन ते वितरण होईपर्यंतच्या साखळीवर लक्ष ठेवून आहेत. या यंत्रणेने बुधवारी मोलाची कामगिरी बजावली.

अशी मदतीला धावली पालिका यंत्रणा...
हिंदू महासभा रुग्णालयात एकूण ६१ कोविड रुग्णांवर उपचार सुरू  आहेत. येथे ५० जणांना ऑक्सिजन पुरवला जात असून ११ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. बुधवारी सायंकाळी ६.३० पर्यंत पुरेल, इतकाच ऑक्सिजन साठा उरला असल्याने रुग्णालय व्यवस्थापन आणि महापालिकेला पाच वाजता संदेश पाठवून मदतीची मागणी केली. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर संबंधित रुग्णालयाशी तातडीने समन्वय साधत ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला.

आणि सायं ६.१५ पोहोचले ऑक्सिजन....
महापालिकेच्या एस (भांडुप) विभागातून नऊ जंबो सिलेंडर या रुग्णालयात सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचविण्यात आले. त्या व्यतिरिक्त रुग्णालयाच्या नियमित ऑक्सिजन पुरवठादाराने चार ड्युरा सिलेंडर सायं. ६.१५ च्या सुमारास पोहोचवले. ते जोडून त्वरित ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच एन (घाटकोपर) विभागातून १५ जंबो सिलेंडर बॅकअप म्हणून त्वरित पाठवण्यात आले. एवढेच नव्हे तर, रुग्णांना स्थलांतरित करण्याची गरज भासली तर त्यासाठी रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या होत्या. सुदैवाने पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्याची आवश्यकता भासली नाही आणि हिंदू महासभा रुग्णालयातील सर्व रुग्ण सुरक्षित आहेत.

ऑक्सीजन पुरवठ्यासाठी आज बैठक...
ऑक्सिजन पुरवठा संदर्भात भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये म्हणून, या रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन व्यवस्था उभी करण्याविषयी एन विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित आंबी यांच्या कार्यालयात गुरुवारी रुग्णालयात व्यवस्थापनाबरोबर तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

Web Title: Andh Mahasabha Hospital saved the lives of 60 patients in mumbai ghatcoper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.