...अन् प्रशस्त मार्ग वाहनचालकांसाठी झाले रेसिंग ट्रॅक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:21 IST2025-10-06T10:21:03+5:302025-10-06T10:21:11+5:30
अटल सेतू, कोस्टल रोडवर टाकतात ‘टॉप गीअर’

...अन् प्रशस्त मार्ग वाहनचालकांसाठी झाले रेसिंग ट्रॅक !
- महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडीवर तोडगा तसेच उपनगर, महामुंबई कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अटल सेतू आणि कोस्टल रोड यासारखे विस्तीर्ण रस्ते तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रवास जलद झाला असला, तरी वाहनांच्या सुसाट वेगामुळे हे रस्ते जणू रेसिंग ट्रॅकच बनले आहेत.
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, शहरातील अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांवर उच्च क्षमतेच्या (हाय-एंड) गाड्या चालवणे शक्य नसल्याने वाहनधारक आता कोस्टल रोड आणि अटल सेतूवर वेगाचा थरार अनुभवत आहेत. मात्र, अशा वेगवान ड्रायव्हिंगदरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी आणि आरटीओने नियमांची कडक अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे, अशी अपेक्षा जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.
शहरातील इतर रस्त्यांवर सिग्नल, वाहतूककोंडी आदींमुळे वाहनांचा वेग कमी असतो. पण कोस्टल रोड आणि अटल सेतूवर तुलनेने वाहने कमी असल्याने चालक वेगाने ती चालवतात. विदेशी, वेगवान आणि महागड्या वाहनांच्या मालकांना या रस्त्यांवरच वाहनाचा वेग तपासण्याचा मोह होतो.
लेन कटिंग, ओव्हरटेकिंग आणि वेगमर्यादांचा भंग अशा घटना वारंवार घडतात. तसेच हे रस्ते समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने पावसाळ्यात ओलसर हवेमुळे वाहनावर नियंत्रण सुटते.
शहरातील रस्ते कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे रुंद आणि सरळ
झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक फक्त कॅमेरा असलेल्या ठिकाणी
वेग कमी करतात आणि नंतर पुन्हा गाडी भरधाव चालवतात. त्यामुळेच अनेक अपघात घडतात. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाचे
कडक आणि सातत्यपूर्ण नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- विवेक पै, वाहतूक तज्ज्ञ
‘स्पीड कंट्रोल ॲक्शन प्लॅन’ची गरज
शहरातील अंतर्गत मार्गांवर सिग्नल मोडणे, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट या आणि अशा अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. असे असताना या दोन्ही रस्त्यांवर कारवाई तुलनेने कमी होते. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी आता संयुक्तपणे ‘स्पीड कंट्रोल ॲक्शन प्लॅन’ राबवणे अत्यावश्यक आहे. स्पीड गन, सिग्नलवरील कॅमेरे, तसेच स्वयंचलित दंड प्रणालीचा वापर करून वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात नियंत्रण आणणे शक्य आहे.