Join us

...अन् शिंदे झाले राजी, देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:20 IST

अडीच वर्षे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असे आधीच जाहीर केले होते.

मुंबई : शिंदेसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबद्दलची साशंकता शपथविधीच्या अडीच तास आधी दूर झाली.

अडीच वर्षे महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय आपल्याला मान्य असेल असे आधीच जाहीर केले होते. मात्र स्वत: ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही, याबाबतची अनिश्चितता गुरुवारी दुपारपर्यंत कायम होती.

देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दोनवेळा शिंदे यांची ‘वर्षा’वर जाऊन भेट घेतली आणि त्यांनी मंत्रिमंडळात यावे यासाठी आग्रह धरला होता. दुपारी  शिंदे गटाच्या सर्व माजी मंत्र्यांनी शिंदेंची भेट घेऊन तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर आम्हीही मंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यानंतर शिंदे हे राजी झाले. त्यानंतर  शिंदेसेनेचे नेते उदय सामंत, भरत गोगावले, राहुल शेवाळे हे मनोनित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यानंतर ते राजभवनावर गेले आणि शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे फडणवीस यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिले.

शिंदे यांना कोणती खाती मिळणार? 

शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासोबत नेमकी कोणती खाती दिली जाणार हे मात्र गुरुवारी देखील स्पष्ट झाले नाही.  गृह तसेच नगरविकास खाते आपणास मिळावे हा त्यांचा आग्रह कायम  असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस