Join us

...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय! त्यांच्यासाठी रस्त्यावर भरते  ‘हॅप्पीवाली पाठशाळा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 07:15 IST

तारे जमीं पर...ही पाठशाला सुरू असताना ३५ वर्षीय मीनाकुमारी झाडाशेजारी उभी राहून हे सगळे पाहायची.

मुंबई : उड्डाणपुलाखाली, पदपथावर राहून सिग्नलवर भीक मागणाऱ्या, नशा करणाऱ्या कोवळ्या हातात पाटी-पेन्सिल देत, विक्रोळीत नोकरी करणाऱ्या विजय माने या तरुणाची ‘हॅप्पीवाली पाठशाळा’ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. याच पाठशाळेत बुधवारी एका विशेष विद्यार्थ्याचाही समावेश झाला आहे. 

घणसोली परिसरात कुटुंबीयांसोबत राहणारा विजय विक्रोळीत टीसीएस कंपनीत नोकरीला आहे. कामावर जाताना सिग्नलवर भीक मागणाऱ्या किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात बसून नशा करणाऱ्या मुलांकडे त्याचे लक्ष गेले. रबाळे, घणसोली, कोपरखैरणे येथील अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्याची पत्नीसोबत धडपड सुरू झाली. 

विजय सांगतो, त्या मुलांचा विश्वास जिंकण्यासाठी आम्ही सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करीत राहिलो. थंडीत कांबळी वाटप, उन्हाळ्यात चप्पल-टोपी वाटप, इतकेच काय त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणांत वस्तीत जाऊन सहभागी झालो. यात ‘छोटीसी आशा’ या अंतर्गत या मुलांची एक दिवसाची सहल काढली. यात गेम झोनमधील धम्माल मस्तीबरोबर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाची मजा, महागड्या हॉटेलात जेवणाचा आनंद घेतला. त्या रात्री चिमुकल्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले, हे एक दिवस जगलेले आयुष्य कायम जगायचे असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे. ‘शिकाल तर टिकाल’ हे मनात बिंबवले आणि तिथूनच ‘हॅप्पीवाली पाठशाळे’चा खरा जन्म झाला.

अखेर ३ जानेवारी रोजी घणसोलीच्या पदपथावर या पाठशाळेचा पहिला वर्ग भरला. पहिल्या दिवशी ६ विद्यार्थी आले. हसतखेळत सुरू असलेल्या शिक्षणामुळे आणि वर्गातील विद्यार्थ्यांच्या गमतीजमती ऐकून सध्या २३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी येथील एका डॉक्टरांनी साई मंदिरामागे जागा देत मुलांसाठी टेबलही दिले आहे.  प्रजासत्ताक दिनानिमित्त या मुलांना गणवेशही देण्यात आल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे.

...आणि ती म्हणाली, मलाही शिकायचेय!ही पाठशाला सुरू असताना ३५ वर्षीय मीनाकुमारी झाडाशेजारी उभी राहून हे सगळे पाहायची. अखेर आठवड्याभराने तिने धाडसाने मलाही शिकायचेय म्हटले. आता ती या वर्गात सहभागी झाली आहे. मूळची राजस्थानची रहिवासी असलेल्या मीनाकुमारीला लहानपणापासून शिकण्याची इच्छा होती. मात्र मुलगी म्हणून शिकता आले नाही. त्यात लग्नानंतर मुंबई गाठली. घणसोली येथील इमारतीत चार घरांत घरकाम करते. ही शाळा सकाळी ९ ते ११ वेळेत भरत असल्याने तिने तिच्या कामाच्या वेळाही बदलल्या आहेत. 

नवी मुंबईपाठोपाठ ठाणे, मुंबईतही पाठशाळा हा प्रवास नवी मुंबईसह मुंबई, ठाणे परिसरापर्यंत न्यायचा आहे. या पाठशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अक्षरांची ओळख करून त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण करणे हा मानस असल्याचे माने याने सांगितले. 

टॅग्स :शाळा