... and 33,000 babies were born in the ambulance | ...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म
...अन् रुग्णवाहिकेत झाला ३३ हजार बाळांचा जन्म

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या १०८ या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात पाच वर्षांत ३३ हजार बाळांचा जन्म झाला आहे. याखेरीज, आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत जवळपास ४२ लाख ४५ हजार रुग्णांना या रुग्णवाहिकेच्या सेवेतून जीवनदान मिळाले आहे.

मागील काही दिवसांत सांगली, कोल्हापूर, सातारा व पुणे या पूरग्रस्त भागांतून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे. २०१४ ते जुलै २०१९ पर्यंत सुमारे ३ लाख ४६ हजार रस्ते अपघातांतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा क्रमांक देण्यात आला असून लाखो नागरिकांसाठी तो जीवनदायी ठरला.

३० बाइक अ‍ॅम्ब्युलन्स
या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू झाली. याद्वारे आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा दिली. या सेवेचा विस्तार करीत मुंबईत १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर, गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाइक अ‍ॅम्ब्युलन्स सध्या कार्यरत आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास म्हणाले.


Web Title:  ... and 33,000 babies were born in the ambulance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.