Join us
Daily Top 2Weekly Top 5

अदानींनंतर अंबानीपुत्रही मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंसोबत तब्बल ३ तास चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 09:22 IST

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.

मुंबई - राज्याच्या राजकारणात सध्या सर्वकाही अनिश्चित घडताना दिसत आहे. शिवसेना पक्षात मोठी फूट पडल्यानंतर आता राज ठाकरेही शिंदे गटाच्या जवळ असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे शुक्रवारी राज ठाकरेंच्या दिपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. तर, दुसरीकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी हे मातोश्रीवर पोहोचले होते. अनंत अंबानी यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर, आता अनंत अंबानी यांनीही भेट घेतली. रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानींचा ताफा मातोश्रीवर दाखल झाला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले. दोघांमध्ये जवळपास ३ तास चर्चा झालीय या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, देशातील एका बड्या उद्योगपतीचा मुलगा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आल्याने राजकीय आणि उद्योगविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अंबानींच्या बंगल्यावर जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अंबांनीची भेट घेतली होती. त्यामुळे, अंबानी कुटुंबीय हे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपत असल्याचे दिसून येते.  

टॅग्स :उद्धव ठाकरेमुकेश अंबानीशिवसेनागौतम अदानी