Among the gold medal winners, | सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुलींचीच सरशी
सुवर्णपदक विजेत्यांमध्ये मुलींचीच सरशी

मुंबई : यंदा मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात सुवर्णपदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. ४० सुवर्णपदक विजेत्यांमध्ये ३३ विद्यार्थिनींचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी पार पडला. या वेळी पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील एकूण १ लाख ९३ हजार ५८९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १ लाख ४ हजार ५९४ विद्यार्थिनी, तर ८८ हजार ९९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पैकी पदवीसाठी १ लाख ६० हजार २१८, तर पदव्युत्तर ३३ हजार ३७१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ४० विद्यार्थ्यांना ५२ पदके बहाल करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ५१ सुवर्ण आणि १ रौप्यपदकाचा समावेश आहे. या ४० पदक विजेत्यांमध्ये ३३ विद्यार्थिनी आहेत. सहा विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन-दोन पदके मिळविली आहेत, तर विधि शाखेतील भूमी दफ्तरी व पार्श्व बानखरिया यांनी प्रत्येकी चार-चार पदके मिळविली आहेत.

गणित हा विषय सगळ्यांना कठीण वाटतो. मात्र एमएस्सीत मला २ सुवर्णपदके मिळाली. गणिताची सूत्रे आणि आपले कंसेप्ट्स क्लिअर असले की गणित कठीण नसते. या यशामुळे माझे कुटुंबीय खूप आनंदी झाले असून मी गणितात पीएच.डी. करावी, अशी त्यांची इच्छा आहे.
- मनाली कदम, विद्यार्थिनी (दोन सुवर्णपदके)

शाखानिहाय आकडेवारी लक्षात घेता या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये मानवविज्ञान (ह्युमॅनिटीज्) शाखेतील २४ हजार २८२, आंतरविद्या शाखेतील (इतर डिसिप्लिनरी) ७ हजार ६०३, वाणिज्य व व्यवस्थापन (कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट) शाखेतील १ लाख ६ हजार ७२४ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान (सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी) शाखेतील ५४ हजार ९८० पदवींचा समावेश आहे. विविध विद्याशाखांतील ३३२ स्नातकांना एमफील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

मी दीक्षान्त समारंभात २ पदकांची मानकरी ठरली आहे. यात एक सुवर्णपदक, तर दुसरे रौप्यपदक असून संस्कृतमधील सर्वोत्तम कामगिरीसाठी मला हे पदक मिळाले आहे. सध्या मी विश्वकोश महामंडळाच्या टीमचा भाग असून, पुढे संस्कृत विषयात एमफिल किंवा पीएच.डी. मिळविण्याचा मानस आहे.
- रेणुका पांचाळ, विद्यार्थिनी (दोन सुवर्णपदके)

‘सॉलिसिटर बनणार’
मी विधि शाखेत ४ सुवर्णपदके पटकावली आहेत. गव्हर्मेन्ट लॉ कॉलेजमध्ये शिकताना सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच मला हा मान मिळाला. पुढे मी सॉलिसिटरची परीक्षा देणार असून, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. आईवडिलांसमोर हा मान मिळाल्याने, त्यांना आनंद देऊ शकले याचे समाधान वाटते.
- भूमी दफ्तारी,
विद्यार्थिनी (चार सुवर्णपदके)

पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी
पदवी विद्यार्थी टक्के विद्यार्थी विद्यार्थिनी
संख्या
पदवीधर १६०२१८ ८२. ७६ ७६८०९ ८३४०९
पदव्युत्तर ३३३७१ १७.२४ १२१८६ २११८५
एकूण १९३५८९ १०० ८८९९५ १०४५९४
 


Web Title: Among the gold medal winners,
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.