Goregaon Gas Leak: मुंबईत बुधवारी रात्री मोठी दुर्घटना टळली. गोरेगाव येथील महानंदा डेअरिच्या प्लांटमधून अमोनिया वायूची गळती सुरु झाली होती. ३००० किलोच्या टाकीच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने अमोनियाची गळती सुरु झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
२३ जुलै रोजी रात्री ९:१२ वाजता गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गानजीकच्या महानंदा डेअरीच्या शीतगृहात अमोनिया वायू गळती सुरु झाली होती. त्यानंतर डेअरीच्या फॅक्टरीतील सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुंबई अग्निशमन विभाग, पोलिस आणि हझमॅट युनिटसह विविध यंत्रणांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली.
महानंदा डेअरीत दुधावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केली जातात. या डेअरीतील शीतगृहात बुधवारी रात्री अमोनिया वायूच्या एका मोठ्या टाकी मधून अचानक गळती सुरू झाली. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे २००० चौरस फूट जागेवर पसरलेल्या तळमजल्यावरील रेफ्रिजरेशन युनिटमध्ये असलेल्या ३,००० किलोग्रॅम क्षमतेच्या टाकीमधून अमोनिया गळती सुरू झाली. टाकीच्या व्हॉल्व्हमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही गळती होत होती. खबरदारीचा उपाय म्हणून, डेअरीच्या इनहाऊस इलेक्ट्रिशियनने प्लांटचा वीजपुरवठा बंद केला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, हजमॅट युनिट, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि वॉर्ड कर्मचाऱ्यांच्या पथकांना तात्काळ माहिती देण्यात आली.
हजमॅट युनिट हे एक विशेष युनिट आहे जे विषारी रसायने, वायू, जैविक घटक किंवा किरणोत्सर्गी पदार्थ यांसारख्या धोकादायक पदार्थांना हाताळण्यासाठी प्रशिक्षित आहे. २५ उपकरणांच्या किटने सुसज्ज असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद पथकाने पुढील गळती रोखण्यासाठी १५ ते १६ व्हॉल्व्ह बंद केले. हजमॅट युनिटने खराब झालेल्या व्हॉल्व्हमधील गळती थांबवण्यासाठी सीलंट वापरला.
बाहेर पडणाऱ्या अमोनियाला रोखण्यासाठी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी तीन हायप्रेशर लाइन आणि चार-मोटर पंपला जोडलेली एक छोटी पाईन लाइन तयार केली. त्यानंतर प्रिझोल ६८ ल्युब्रिकंट ऑइलमध्ये मिसळलेला १५ ते २० किलो अमोनिया वायू सुरक्षितपणे दुसऱ्या टाकीमध्ये हलवण्यात आला. त्यानंतर रात्री रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी परिस्थिती नियंत्रणात आली.