मुंबई - मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचीमनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. बाळा नांदगावकरांनी हा प्रस्ताव मांडला असून, त्याला इतरांनी अनुमोदन दिलं आहे. त्यानंतर अमित ठाकरेंनी मंचावर येत भाषणातून भावना व्यक्त केल्या. अमितच्या भाषणावेळी त्यांच्या आई शर्मिला ठाकरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, अमितची नेतेपदी निवड झाल्याचा अत्यानंद आहे, असेही शर्मिला यांनी म्हटले आहे.
मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याचे आभार मानेल. कारण, तो केवळ एक अहवाल वाचणार आहे, असंच आम्हाला सांगण्यात आलं होतं. मात्र, आज त्याची नेतेपदी निवड झाल्यानं मला अतिशय आनंद झाल्याचं अमित ठाकरे यांच्या आई शर्मिला ठाकरेंनी म्हटलंय. तसेच, नेता बनलेल्या आपल्या मुलाला मायेचा सल्लाही त्यांनी दिलाय. अमित गेल्या दोन-तीन वर्षात अनेक आंदोलनात सहभागी झालाय. तेच त्यानं पुढे सुरू ठेवावं. नेतेपद असतं-नसतं, पण तुम्ही जेवढी जास्त लोकांची कामे करता, तेवढी लोकं जास्त तुमच्याशी जोडली जातात. आज महाराष्ट्रात खूप जटील प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न लोकांची कामं करा, लोक तुमच्या मागे येतील, असा मायेचा सल्ला शर्मिला यांनी आपल्या 'राज'पुत्राला दिला आहे. राज ठाकरेंच्या अनेक सभा झाल्या, पण आम्ही कधीच व्यासपीठावर जात नाहीत. मात्र, आज त्याला व्यासपीठावर पाहून अन् बोलताना पाहून मला अंगावर काटा आला, डोळ्यात अश्रू आले, असे शर्मिला यांनी म्हटले आहे.