Join us  

...म्हणून अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण आली- संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 8:09 AM

अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण का आली?

मुंबई: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला चिमटे काढले आहेत. पालघरमध्ये शिवसेनेची ताकद पाहिल्यानंतर अमित शहा यांना चार वर्षात पहिल्यांदाच मातोश्रीची आठवण झाली, असा टोला राऊत यांनी हाणला. मात्र, त्याचवेळी शिवसेना 'एकला चलो रे' च्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचा दावाही राऊत यांनी केला.सध्या एकएक करुन मित्रपक्ष भाजपाची साथ सोडत आहेत. भाजपाविरुद्ध देशात रोष वाढत चालला आहे. त्यामुळे कदाचित आता भाजपाच्या नेतृत्त्वाला जुन्या मित्रांना परत भेटावेस वाटत असेल. शिवसेनेच्याबाबतीत पालघरमध्ये भाजपाला आमची खरी ताकद कळली. त्यानंतर अमित शहांना चार वर्षांनी मातोश्रीची आठवण यावी, हे दुर्देव म्हणावे लागेल. भाजपाच्या भूमिकेत असा बदल का झाला, याचा विचार सर्वांनीच करायला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय हा जनमताचा कानोसा घेऊन व विचारपूर्वक घेतला आहे. त्यामुळे कोणाही किती समजूत काढायचा प्रयत्न केला तरी उद्धव ठाकरे या भूमिकेवर ठाम राहतील, असा विश्वासही यावेळी राऊत यांनी व्यक्त केला. 

 केंद्रात सत्तेत आल्यापासून शिवसेनेला काडीची किंमत न देणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुधवारी स्वत: मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अमित शहा उद्या भाजपाच्या संपर्क दौऱ्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातच्या आसपास उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांना भेटतील. या भेटीच्या माध्यमातून भाजपाने एकप्रकारे युतीच्या टाळीसाठी हात पुढे केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे अमित शहा यांना टाळी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :संजय राऊतअमित शाहउद्धव ठाकरे