Join us

मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:14 IST

मित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला

सुजित महामुलकर 

मुंबई : गेले तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला आणि मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरात स्वबळावर निवडणुका लढवण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, शाह हे मुंबईत असल्याची संधी साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी त्यांची ‘सह्याद्री’ अतिथिगृहावर  भेट घेतली. या भेटीत शिंदे यांनी मुंबईतील जवळपास १०७ जागांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. या भेटीत राज्यातील काही महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. यात सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो मुंबई महापालिका निवडणुकीचा. 

मुंबईत २२७ प्रभाग असून, त्यातील जवळपास १०७ प्रभागांत आपल्याकडे उमेदवार तयार असल्याची माहिती शिंदे यांनी शाह यांना दिल्याचे कळते. शाह यांनी शिंदे यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, असे सांगण्यात आले.  

शाह यांनी गेल्या दोन दिवसांत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा थोडक्यात आढावा घेतला. मुंबई, ठाणे आणि पुणे या  महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याची परिस्थिती आणि त्यातून यश मिळण्याची शक्यता किती, याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना दिल्याचे समजते. 

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळे लढूनही एकसंघ असलेल्या शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने ८२ पर्यंत मजल मारली होती. सध्या शिवसेनेची दोन शकले उडाली आहेत आणि भाजपची ताकद वाढली असल्याचे चित्र आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील दाखवत पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाच्या नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला प्रभाग रचना करण्याच्या सूचना दिल्या.

प्रशासकीय राजवट असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था किती? 

सध्या राज्यात प्रशासकीय राजवट असलेल्या २९ महानगरपालिका आहेत. ३४ पैकी ३२ जिल्हा परिषदांवर प्रशासक आहेत, तर एकूण ३५१ पंचायत समित्यांपैकी ३३६ समित्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. 

राज्यातील नगर परिषदांची संख्या २४८ असून, सर्व ठिकाणी प्रशासक आहेत आणि एकूण १४७ नगर पंचायतींपैकी ४२ प्रशासकांच्या नियंत्रणाखाली आहेत. 

टॅग्स :अमित शाहमुंबई महानगरपालिका