Join us

“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 02:35 IST

टीस प्रशासनाने विविध स्कूलचे प्रमुख आणि केंद्रांना तसे निर्देश दिले.   

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की आणि अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला समर्थन दिल्यामुळे टाटा समाज विज्ञान संस्थेने (टीस) या देशांशी कोणतेही करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे करारही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टीस प्रशासनाने विविध स्कूलचे प्रमुख आणि केंद्रांना तसे निर्देश शुक्रवारी दिले.   

युद्धजन्य परिस्थितीत तुर्की आणि अझरबैजान यांनी पाकिस्तानला समर्थन दिले होते. त्यातून या देशांविरोधात व्यापारी, पर्यटक आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून बहिष्कार टाकला जात आहे. त्यामध्ये देशातील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि आयआयटी रुरकी यांनीही या देशातील शैक्षणिक संस्थांशी केलेले विविध करार रद्द केले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुढील आदेशांपर्यंत या दोन देशांशी कोणतेही करार करू नयेत. तसेच यापूर्वी केलेले करार निष्क्रिय करून त्यावर कोणतीही कार्यवाही करू नये, असे या आदेशात नमूद केले आहे. टीस प्रशासन देशासोबत आहे, असेही नमूद केले आहे. दोन्ही देशांसोबत टीसमधील प्रकल्प सुरू आहेत, त्याचेही काम करता येणार नाही, , असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यापूर्वी टीस प्रशासनाने कोणताही करार या दोन देशांशी केला नाही, अशीही माहिती त्यांनी दिली. 

या दोन्ही देशांनी भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय उद्दिष्टांसाठी हा निर्णय घेतला आहे. आम्ही या दोन देशांशी कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती टीसचे प्रभारी कुलगुरु प्रा. मनोजकुमार तिवारी यांनी दिली.

 

टॅग्स :ऑपरेशन सिंदूरभारत विरुद्ध पाकिस्तान