आयुष्य वाचवणाऱ्या रुग्णवाहिकाच ‘आजारी’; अनेक वाहनांची दुर्दशा, जीपीएस बसविणे अनिवार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:16 IST2025-10-05T09:16:43+5:302025-10-05T09:16:54+5:30
विमा, पीयूसी, योग्य देखभाल यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायी असली, तरी स्वत:च आजारी पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आयुष्य वाचवणाऱ्या रुग्णवाहिकाच ‘आजारी’; अनेक वाहनांची दुर्दशा, जीपीएस बसविणे अनिवार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत अनेक नव्या रुग्णवाहिका असल्या तरी अजूनही अनेक जुन्या रुग्णवाहिकांची दुर्दशा झाली आहे. नियमाने प्रत्येक रुग्णवाहिकेला ‘जीपीएस’ बसविणे अनिवार्य असूनही अनेक वाहनांत ते बसवलेलेच नाही. याशिवाय विमा, पीयूसी, योग्य देखभाल यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायी असली, तरी स्वत:च आजारी पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरम्यान बहुतांशी रुग्णवाहिकांचे आराेग्य बिघडलेले दिसत असून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
नियम धाब्यावर बसवून रुग्ण वाहतूक
मुंबईत सध्या अनेक शासकीय तसेच खासगी रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र मोठ्या संख्येने रुग्णवाहिकांची स्थिती निकृष्ट असल्याची तक्रार आहे. काही रुग्णवाहिकांची टायर, ब्रेक, लाईटसारखी मूलभूत साधनेच निकामी अवस्थेत आहेत.
अपघात झाल्यास अशा वाहनांतून रुग्णवाहतूक करणे धोकादायक ठरू शकते. आरटीओच्या तपासणीत अनेक रुग्णवाहिकांकडे वैध विमा नाही, तर काहींकडे पीयूसी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. नियम धाब्यावर बसवून जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे.
वाहन कायद्यातील नियम काय?
प्रत्येक रुग्णवाहिकेकडे वैध परवाना, प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र (पीयूसी), विमा, वेळोवेळी मेंटेनन्स तसेच अनिवार्य जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे. तसेच १५ वर्षांपेक्षा जुनी रुग्णवाहिका रस्त्यावर वापरता येत नाही. रुग्णवाहिकांसाठी जीपीएस बसवणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून अपघात, आपत्तीच्या वेळी तत्काळ शोध घेता येईल.
मात्र अनेक खासगी रुग्णवाहिकांत हा नियम पाळला जात नाही. वाहन कायद्यानुसार १५ वर्षांपेक्षा जुनी रुग्णवाहिका वापरता येत नाही. तरीही मुंबईत अनेक ठिकाणी जुन्या रुग्णवाहिका रुग्णांना नेण्यासाठी धावताना दिसतात.