मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पात ट्रॅकचे काम करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचआरसीएल) मंगळवारी लार्सन अँड टुब्रो कंपनीसोबत करार केला. याअंतर्गत, महाराष्ट्रातील १५७ किमी लांबीच्या मार्गावर ट्रॅक आणि डिझाइन, पुरवठा, बांधकाम, चाचणी आणि कार्यान्वित करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
एल अँड टीसोबत सुमारे ४ हजार ४०० कोटी रुपयांचा हा करार केला असून, त्यामुळे महाराष्ट्रात प्रकल्पाला गती मिळणार आहे. यामाध्यमातून बीकेसी बुलेट ट्रेन स्टेशन ते महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील जरौली गावापर्यतच्या मार्गावर ट्रॅक टाकण्यात येणार आहेत. यात चार स्थानके आणि ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपो यांचा समावेश आहे.
फायदा काय होणार?
सध्या ५०० मीटर वायडक्टचे काम पूर्ण झाले असून, सुमारे १० किमीपेक्षा जास्तचा मार्ग तयार होईल. तेव्हा ट्रॅकचे काम सुरू करण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकारी म्हणाले. बुलेट ट्रेन सुरू झाल्यावर मुंबई-अहमदाबादमधील अंतर फक्त दोन तासांत पूर्ण करता येईल.
जपानी तंत्रज्ञानाची मदत
बुलेट ट्रेन प्रकल्पात जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानाची 'बॅलास्ट-लेस स्लॅब ट्रॅक सिस्टम' वापरली जात आहे. हा ट्रॅक आरसी ट्रॅक बेड, सिमेंट डांबर मोर्टार, प्री-कास्ट ट्रॅक स्लॅब आणि रेल फास्टनर या चार भागांपासून बनलेला आहे. या तंत्रज्ञानामुळे गाड्यांचा वेग आणि सुरक्षितता दोन्ही अबाधित राहील.