आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 11:14 IST2026-04-05T11:12:17+5:302026-04-05T11:14:52+5:30
CSMT Panchavati Express News: ट्रेन स्थानकात आली, दोन तास उशिरा सुटली. इतकेच नाही, तर एक कोच न घेताच ही ट्रेन रवाना करण्यात आली. नेमके झाले तरी काय?

आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
CSMT Panchavati Express News: रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रकारचे अनुभव प्रवासी घेत असतात. काही सुखद असतात, तर काही त्रासदायक असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असाच एक वेगळाच अनुभव आला आहे. ट्रेन स्थानकात आली, पण दोन तास उशिरा सुटली. इतकेच नाही, तर एक कोच न घेताच ही ट्रेन रवाना करण्यात आली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMt) येथून पंचवटी एक्स्प्रेस एक कोच न घेताच मनमाडच्या दिशेने रवाना करण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेसच्या एका कोचच्या चाकात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. एक डबा कमी असल्याने दादर, कल्याणमधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
कोच ‘सिक’ घोषित करून दुरुस्तीसाठी यार्डात नेला
मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस सायंकाळी ६.१५ वाजता रवाना होते. ही ट्रेन सीएसएमटी स्थानकावर दाखल होत असताना डी-१ क्रमांकांच्या कोचच्या चाकात तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यामुळे ट्रेन तातडीने थांबवण्यात आली. सदर माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. बिघाड गंभीर असल्याने हा कोच ‘सिक’ घोषित करून दुरुस्तीसाठी यार्डमध्ये नेण्यात आला. या गोंधळामुळे सीएसएमटीहून सायंकाळी ६.१५ वाजता रवाना होणारी पंचवटी रात्री ८.११ वाजता हा बिघडलेला कोच न घेताच रवाना करण्यात आली.
दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे पंचवटीला नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. त्यामुळे डी-१ कोचमधील प्रवाशांची अन्य डब्यांत व्यवस्था करण्यात आली. ज्यांना प्रवास रद्द करायचा होता, त्यांच्यासाठी तिकीट परताव्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.