Join us

रिक्षाचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्या; मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 06:39 IST

१ जूनपासून सुरू करू द्यावी

मुंबई : रिक्षा चालक-मालकांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा रोजच्या धंद्यावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर संकट ओढवले आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा दैनंदिन खर्च भागविता यावा म्हणून १ जूनपासून राज्यातील सर्व क्षेत्रात रिक्षाचालकांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनने केली आहे.

मुंबई आॅटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, लॉकडाउन सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. रिक्षा चालक-मालकांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा रोजच्या धंद्यावर अवलंबून आहेत. कोरोनामुळे त्यांच्या धंद्यावर संकट ओढवले आहे. त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे.

कोरोनाचा धोका असतानाही अनेक चालक जीव धोक्यात घालून रिक्षा चालवत आहेत. पण सरकारच्या नवीन नियमांचे उल्लंघन झाल्याने रिक्षा जप्त करण्यात येत आहेत. त्यांची रिक्षा जप्त न करता जर सरकारने त्यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेतली तर कोणताही चालक सरकारच्या नियमाविरोधात रिक्षा चालविणार नाही. सरकारने रिक्षाचालक आणि मालकांच्या कुटुंबीयांना सरकारने दहा हजारांची मदत करावी, असे ते म्हणाले.

तसेच राज्य सरकारने असंख्य बेरोजगार युवकांना रिक्षाचा परवाना दिला आहे. त्यामुळे त्यांना त्या उत्पन्नावर दैनंदिन गरजा भागविता येत आहेत. परंतु गेल्या एक महिन्यापासून असे हजारो रिक्षाचालक घरी बसून आहेत. लॉकडाउनच्या काळात मोठे नुकसान झाले असून त्यांना व्याजासह इएमआय भरावा लागत आहे. रिक्षाचालकांच्या रिक्षाचे कर्ज आणि त्यावरील कर्ज माफ करावे, अशीही मागण्ी होत आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसऑटो रिक्षा