Join us  

'लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल रेल्वे प्रवासाची सूट द्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 6:20 PM

BJP : भाजपा उत्तर मुंबईतर्फे या  संदर्भात आज बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकावर उग्र आंदोलन करण्यात आले.

मुंबई: मुंबई शहराचे कामगार, मध्यमवर्गीय नोकरदार , छोटे व्यावसायिक यांना मुंबईत  रोजगारसाठी प्रवास करणे गरजेचे असते. परंतू कोरोना काळात मुंबई लोकल मध्ये सर्वसामान्यांना प्रवास करण्याची परवानगी नसल्याने त्यांना खाजगी वाहतूक, टॅक्सी व रिक्षाने प्रवास करावा लागती. आर्थिक दृष्ट्या हे खर्चिक  असून परिणामी नागरिकांना  नाहक मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो.

 भाजपा उत्तर मुंबईतर्फे या  संदर्भात आज बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकावर उग्र आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात दहिसरच्या आमदार मनीषा  चौधरी, बोरिवलीचे आमदार सुनील राणे,उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष गणेश खणकर यांनी केले.

यावेळी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास साठी परवानगी देण्यात यावी, या संदर्भात एक निवेदन बोरीवली रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर  राजेश गौर यांना प्रवीण दरेकर, खा.गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे आणि अध्यक्ष गणेश खणकर  यांच्या शिष्टमंडळाने सादर केले.

मुंबईत ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस घेतले आहे त्यांचे प्रमाणपत्र बघून लोकल रेल्वेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, याविषयी  भाजपा नेत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारच्यावतीने या विषयी सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे आता राज्य सरकारने यावर निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी आणि प्रवीण दरेकर यांनी केली. 

खासदार गोपाल शेट्टी पुढे म्हणाले की, नागरिकांनी कोरोना काळात अनेक अडचणी भोगल्या आहे. आजारपण, स्वतः चे नातेवाईकांचे दुःखद निधन, आर्थिक समस्या, घर चालवायला स्वतः चे जमा पैसे खर्च करून पुढे उसने घेऊन ही घर चालवले. यापुढे त्यांना आणखीन त्रास देणे अन्यायकारक होणार आहे. 

या आंदोलनात भाजपा युवा आघाडी महिला आघाडी, रेल्वेने प्रवास करणारे नागरिक, उत्तर मुंबईतील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. या स्वाक्षरी अभियानात हजारों नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांना लवकर रेल्वे प्रवास सुरु करण्यासाठी आपल्या स्वाक्षऱ्या दिल्या.

टॅग्स :मुंबई लोकलरेल्वेभाजपाकोरोनाची लस